मुंबईतल्या महिला आयोगानं केली ओमानमधल्या भारतीय महिलेची सुटका


मुंबईतल्या महिला आयोगानं केली ओमानमधल्या भारतीय महिलेची सुटका
SHARES

नोकरीच्या आमिषाला बळी पडून मुंबईच्या अंबरनाथमधून दुबईला गेलेल्या एका महिलेला फसवून मस्केटला नेण्यात आले. या महिलेने एका हेल्पलाईनच्या मदतीने मुंबईतल्या महिला आयोगाशी संपर्क साधला. त्यानंतर, तातडीनं सूत्र हलवण्यात आली आणि या महिलेची सुटका करण्यात आली.


नोकरीसाठी गाठलं दुबई

अंबरनाथ इथं राहणाऱ्या फरीदा खानला दुबईला नोकरी करायची होती. त्यानुसार तिनं एका एजंटशी संपर्क साधत दुबईला नोकरी मिळवली. फरीदा दुबईला गेली, पण दुबईला गेल्यानंतर दुबईतील एजंटनं फरीदाला दुबईत न ठेवता थेट मस्केटला पाठवलं. आपण दुबईत काम करायला आलो असताना आपल्याला मस्केटला का घेऊन गेले? हे तिला कळेना. इतकंच काय तर फरीदाचा मोबाईलही या एजंटनं काढून घेतला. तर दुबईत आल्याबरोबरच मुंबईतल्या एजंटचा संपर्क होत नव्हता.


एजंटनं फसवून पाठवलं मस्केटला

मस्केटमध्ये गेल्यानंतर फरीदावर घरकामाचं काम सोपवण्यात आलं. १८ खोल्यांच्या साफसफाईसह इतर काम तिच्यावर टाकण्यात आलं. १५-१६ तास तिच्याकडून काम करून घेतलं जायचं. तिला खायला-प्यायला व्यवस्थित दिलं जात नव्हतं. इतकंच काय तिला मारहाणही केली जात होती. शेवटी कसाबसा तिनं आपल्या पतीशी संपर्क साधला आणि त्यानंतर तिच्या पतीनं थेट मुंबईतील राज्य महिला आयोगाच्या सुहिता या हेल्पलाईनवर संपर्क साधत ही कहाणी सांगितली.


परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने झाली सुटका

महिला आयोगाची टीम कामाला लागली नि केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीनं फरीदाची सुखरूप सुटका केली. मानवी तस्करी त्यातही महिलांची तस्करी हा सध्या देशस्तरावरील एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच राज्य महिला आयोगानं महिला तस्करीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुहिता हेल्पलाईन सुरू केली असून या हेल्पलाईनवर देशातीलच नव्हे तर जगभरातील भारतीय महिलांना संपर्क साधत आवश्यक ती मदत घेता येते. त्यानुसार सुहिता हेल्पलाईन अशा पीडित महिलांसाठी नवसंजीवनी ठरत असून सुहितानं पहिल्यांदाच परदेशातील महिलेला न्याय देण्यात यश मिळवलं असून ही मोठी समाधानाची बाब असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. फरीदाने शुक्रवारी रहाटकर यांची भेट घेत महिला आयोगाचे आभार मानले.


सुहितानं केली फरीदाची मदत

जानेवारी २०१८ मध्ये फरीदा दुबईला आणि त्यानंतर मस्केटला गेली होती. मात्र तिचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्र काढून घेतल्यानं तिचा परतीचा मार्ग बंद झाला होता. तिचा मोठ्या प्रमाणात मस्केटमध्ये छळही होता होता. पण महिला आयोगाच्या आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीनं फरीदाची मस्केटमधून सुटका झाली. १ मे ला फरीदाला मुंबईत पाठवण्यात आले. फरीदानं आपल्यासारख्या अनेक फरीदा जगभरात असून त्यांचीही सुटका व्हावी अशी आशा व्यक्त केली असून यासाठी सुहिताची मदत घेण्याचं आवाहन पीडितांना केलं आहे.


एजंटविरोधात दाखल होणार गुन्हा?

दरम्यान, मुंबईतील ज्या एजंटनं आपली फसवणूक केली, त्या एजंटला आता धडा शिकवण्याचा निर्णय फरीदानं घेतला आहे. त्यानुसार या एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा गुन्हा दाखल करून घ्यावा, यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना विनंती केली जाणार असल्याचं यावेळी रहाटकर यांनी सांगितलं आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा