पार्वतीवर प्रेम करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 Kurar Village
पार्वतीवर प्रेम करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पार्वतीला आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवणाऱ्या एका इसमाला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. चक्रावलात ना? पण ही पार्वती आहे टीव्ही सिरियलमध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौनारिका भदौरिया आणि पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे स्वप्नील किर्ती.

स्वप्नील किर्ती (22) गडचिरोलीच्या कोरखेडा गावातील राहाणारा आहे. तो बी कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. लाइफ ओकेवर येणाऱ्या 'देवो के देव महादेव' ही मालिका पाहून तो त्या मालिकेत पार्वतीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री सोनारिका भदौरिया हिच्या प्रेमात पडला. त्याने तिचा मोबाईल नंबरही शोधून काढला आणि ऑक्टोबर 2016 पासून ते 4 फेब्रुवारी 2017 या कालावधीत तिला सतत अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवत राहिला. यादरम्यान आपल्याला असे अश्लील व्हिडिओ पाठवू नयेत याबाबत सोनारिकाने  अनेकदा त्याला सांगितले होते. पण त्यानंतरही तो व्हिडिओ, फोटो पाठवत राहिला. इतकेच नाही, तर आपले तुझ्यावर खूप प्रेम असून आपल्याला लग्न करायचे आहे असा मेसेजही त्याने सोनारिकाला पाठवला होता. शेवटी तिने कंटाळून अखेर 4 मार्च 2017 रोजी त्याच्याविरोधात कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.कुरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात या प्रकरणाची चौकशी करत होते. 26 एप्रिलला नक्षलांचे वास्तव्य असलेल्या कोरखेडा गावात ते गेले असता मोबाईल ट्रॅकिंगच्या मदतीने त्यांनी आरोपी स्वप्नीलला पकडून मुंबईत आणले. त्यानंतर पोलिसांनी भादंवि कायदा कलम 354 (द) (2), 504, 67 आणि आयटी कलम 2000 अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 2 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading Comments