‘लायटर पिस्टल’च्या मदतीने तरुणाने केली मोबाइल चोरी


‘लायटर पिस्टल’च्या मदतीने तरुणाने केली मोबाइल चोरी
SHARES

मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. मोबाइल खरेदीसाठी पैसे नसल्याने अंधेरीत एका २३ वर्षीय तरुणाने सिगारेट पेटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिस्तुल लायटरचा वापर करून दुकानातून तब्बल ८५ हजाराचा मोबाइल चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी २३ वर्षीय जिम ट्रेनरला अटक केली आहे.

अंधेरीच्या उच्चभ्रू वस्तीत राहाणार आरोपी दानिश जमिल खान (२३) हा जिम ट्रेनर आहे. त्याचे वडिल हे फिल्मसिटीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतात. एकुलता एक असलेल्या दानिशचे घरातल्यांकडून प्रचंड लाड केले जायचे. मागील अनेक दिवसांपासून दानिश हा आयफोन हा मोबाइल वापरत होता. मात्र कित्येक वर्ष वापरलेला तो फोन व्यवस्थित चालत नव्हता. तसेच महागडा मोबाइल खरेदी करणे हे त्याच्या खिशाला परवडणारे नव्हते. चांगला मोबाइल नसल्यामुळे दिवसेंदिवस तो अस्वस्थ होत होता. दानिशचे वडिल फ्लिमसिटी मध्ये असल्याने त्याच्या घरात अनेक अँन्टीक पिस होते. त्यावेळी घरात असलेल्या एका अँन्टीक पिसवर दानिशची नजर पडली. ती म्हणजे सिगारेट पेटवणारे पिस्तुल... अगदी हुबेहुब पिस्तुली सारखे असलेले लायटर पाहिल्यानंतर कुणालाही ते लायटर आहे यावर विश्वास बसणार नाही. याच लायटरच्या मदतीने दुकानात दरोडा टाकून एक महागडा मोबाइल चोरण्याचे दानिशने ठरवले.

त्यानुसार गुरूवारी सायंकाळी मोबाइल खरेदी करण्याच्या उद्देशाने दानिश हा स्टाईल शाँप ट्विंकल अपार्टमेंटमधील मोबाइलच्या दुकानात शिरला. त्यावेळी त्याने सिगारेट पेटवणारे पिस्तुल दुकानदरावर ताणून धरली. पिस्तुल पाहून दुकानदाराच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी दानिशने दुकानदाराकडे ‘सॅमसंग एश २१ माँडेल’ असलेला मोबाइल मागितला. क्षणाचाही विलंब न लावता दुकानदाराने तो मोबाइल दानिशच्या ताब्यात दिल्यानंतर दानिशने तेथून पळ काढला. या प्रकरणी दुकानदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यात कलम ३९२ भा.द.विसह ३,२५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दुकानाचे सीसीटिव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली. शुक्रवारी सकाळी ओशिवरा पोलिसांनी दानिशला अटक केली असून त्याच्याजवळी सिगारेट पेटवणारे पिस्तुलही हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उद्या दानिशला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोबाइलच्या हव्यासापोटी त्याने हे कृत्य केल्याची कबूली पोलिसांना दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा