Advertisement

मुंबईतील चिनी वारसा जपणारं चायना टेंपल

चिनी मंदिर सुमारे दीडशे वर्ष जुने असून ते मुंबईतील चिनी पंरपरा आणि चिनी संस्कृतीचं प्रतीक आहे.

मुंबईतील चिनी वारसा जपणारं चायना टेंपल
SHARES

मोठमोठी जहाजे, प्रशस्त बंदर आणि कायम व्यापारी हालचालींनी गजबजलेलं अशी माझगाव डॉकची ओळख. या गजबजलेल्या माझगाव डॉकजवळच्या एका चिंचोळ्या गल्लीत वसलेलं प्रशस्त चायना टेम्पल. चायना टेम्पल तेही मुंबईत? कसं काय? मुंबईत कुठे चिनी वंशज राहतात? असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच डोकावले असतील. पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, मुंबईत देखील चिनी वंशाची लोकं गुण्यागोविंदानं नांदतात.


दीडशे वर्ष जुनं मंदिर

मुंबई ही सात बेटांनी बनली आहे. माझगाव हे त्यापैकीच एक. या माझगाव डॉकजवळच्या लाकडी इमारतीत चायना टेंपल (चिनी मंदिर) आहे. भारतात कोलकाता आणि मुंबई या दोनच ठिकाणी चिनी मंदिरं आहेत. माझगावचे चिनी मंदिर सुमारे दीडशे वर्ष जुने असून ते मुंबईतील चिनी पंरपरा आणि चिनी संस्कृतीचं प्रतीक आहे.


वास्तूला बाहेरून निरखून पाहिलं तर हे एखादं मंदिर आहे असं अजिबात वाटत नाही. साधारण घरासारखेच ते दिसते.  पण प्रत्यक्षात तेच चिनी प्रार्थना स्थळ आहे. मंदिरातील बहुतांश वस्तू या लाल रंगातील आहेत. कारण लाल रंग चिनी लोकांमध्ये शुभ मानला जातो.


असं आहे मंदिर

मंदिर दुसऱ्या मजल्यावर असून लहानच आहे. लाकडी पायऱ्या चढताना तुम्हाला तीन चिनी देवता फुक, लुक आणि साऊ यांची भिंतीचित्र दिसतील. चिनी नागरिक यांच्या विचारांचं पालन करतात. मंदिराचं प्रवेशद्वार पवन चिमण्या, कागदाचे कंदील आणि चिनी शिलालेखांनी सजवलं गेलं आहे. 


मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला मोठा नगारा आहे. पूजा-आरतीनंतर हा नगारा वाजवला जातो. उजव्या बाजूलाच चिनी लोकांच्या 'क्वॉन टाइ कोन' या देवाची त्याच्या दोन भावांसह सुवर्णजडित चौकटीची तसबीर आहे. चिनी लोकांची पूजाअर्चा साधारण हिंदू पद्धतीशी मेळ खाणारी आहे. आपल्यासारखेच चिनी लोक देवापुढे अगरबत्ती लावतात आणि नैवेद्य म्हणून  दाखवतात. फक्त देवाला ओवळताना निरंजनाचा नाही तर मेणबत्तीचा वापर केला जातो. शांतता, समृद्धी आणि भरभराटीची प्राप्ती व्हावी या उद्देशानं देवाची पूजा केली जाते.

मंदिरात लाफिंग बुद्धा आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत. प्राचीन चिनी संशोधकांनी खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्या आधारे तयार केलेली भाग्य कार्डे मंदिराच्या बाजूच्या भिंतीवर लावलेली दिसतात. देवळात एक पेटी आहे. त्यात प्युचर स्टिक ठेवलेल्या आहेत. त्या पेटीमधील हवी ती स्टिक भाविक निवडू शकतात. स्टिकवरील सांकेतिक भाषा ओळखणाऱ्या व्यक्तीच्या मदतीनं तुम्ही स्वत:चे भविष्य जाणून घेऊ शकता.


क्वान कुंग देवाबरोबरच क्वांग यिम या देवीची देखील उपासना होते. पहिल्या मजल्यावर क्वांग यिम देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.


कुणी उभारलं मंदिर?

'क्वॉन टाई कोन' हा सदाचरणी आणि पराक्रमी योद्धा होता. तो उत्तम मार्गदर्शक म्हणून ओळखला जायचा. त्याचे मार्गदर्शन मिळावं यासाठीच ईस्ट इंडिया कंपनीत काम करणाऱ्या खलाशांनी १९१९ साली मुंबईत हे मंदिर उभारलं.


चायना टाऊन

अठराव्या शतकात इस्ट इंडिया कंपनीच्या काळात चिनी मुंबईत आले होते. गोदीत काम करणाऱ्या चिनी लोकांनी माझगावमध्ये छोटेसे चायना टाऊनच वसवले होते. १९६२ ला भारत-चीन यांच्यात युद्ध झाले. युद्धानंतर चिनी नागरिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यामुळे अनेक चिनी मुंबई सोडून मायदेशी परत गेले. पण काहींनी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला. आजही चायना टाऊन त्याच जागी आहे. पण बोटावर मोजता येतील एवढीच चिनी घरं उरली आहेत.

तुम्ही देखील मंदिराला भेट देऊन इथली शांती अनुभवू शकता. तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. मंदिर सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत खुले असते. मध्ये रेल्वेच्या भायखळा स्थानकापासून किंवा हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड स्थानकावर उतरून काही मिनिटांच्या अंतरावर नवाब टँक मार्ग आहे. या मार्गावरच चिनी बौद्ध मंदिर आहे.

कुठे : चिनी बौद्ध मंदिर, नवाब टँक, भायखळा/डॉकयार्ड रोड
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६.३०



हेही वाचा

ढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा