Advertisement

मुंबापुरीला अस्सल सातारी टच! जानेवारीत रंगणार माणदेशी महोत्सव

माण. सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना स्थापना करण्यात आली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा 'माणदेशी महोत्सव' मुंबईमध्ये भरवला जातो.

मुंबापुरीला अस्सल सातारी टच! जानेवारीत रंगणार माणदेशी महोत्सव
SHARES

माण. सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना स्थापना करण्यात आली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा 'माणदेशी महोत्सव' मुंबईमध्ये भरवला जातो. यंदा देखील हा महोत्सव ४ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहेत, अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी दिली.


काय आहे या माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी

मुंबईकरांना महोत्सवामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठीची जाती व खलबत्ते, केरसुणी, दुरड्या, सुपल्या हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे.

या वर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणची, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहेत. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी तब्बल २० हजार मुंबईकरांनी माणदेशी महोत्सवाला भेट दिली होती. नंदा शेलार या शेतकरी महिलेने त्यांच्या शेतात पिकलेल्या १५० किलो भाताची विक्री केली. आज त्या भाताच्या मोठ्या उत्पादक विक्रेत्या आहेत. माणदेशी महोत्सवामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज त्या त्यांच्या गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अशा अनेक यशोगाथा माणदेशी महोत्सवाने साकार केल्या आहेत.


मुंबईकरांना गावाकडील संस्कॄतीचा प्रत्यक्ष अनुभव

या महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार. बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला इथे पहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा? हे शिकू शकता. तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता.

दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गाझी लोकनृत्य देखील पाहायला मिळणार आहे. एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.
गुरुवार ४ जानेवारी ते रविवार ७ जानेवारी असा ४ दिवस प्रभादेवी येथे चालणारा माणदेशी महोत्सव सर्वांसाठी मोफत आहे, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजक आणि माणदेशी फांऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा