Advertisement

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन


ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन
SHARES

आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. शिरीष पै यांच्या निधनामुळे एका प्रतिभावान, प्रयोगशील कवियित्रीला मुकल्याची भावना मराठी साहित्यविश्वात व्यक्त होत आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. वडिल आचार्य अत्रे यांच्याकडून लेखनाचे बाळकडू मिळाल्यानेच शिरीष पै यांनी कथा, कविता, ललित लेखन, बाल साहित्य, नाटक अशा सगळ्याच साहित्य प्रकारांत मुक्त संचार केला. घरातील वातावरणामुळेच आपसूकच त्यांच्यावर मराठी साहित्य आणि वाचनाचे संस्कार झाले. मराठी भाषेवर त्याचे निर्वाज्य प्रेम होते. त्यातूनच त्यांनी मराठी साहित्यात अभिनव प्रयोग करत जपानी साहित्यातील ‘हायकू’ हा अल्पाक्षरी जपानी काव्यप्रकार मराठीत आणला. एवढेच नव्हे, तर लिखाणाच्या स्वतंत्र शैलीच्या आधारे त्यांनी हा काव्यप्रकार रसिकांमध्ये लोकप्रियही केला.



संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान १९५६ मध्ये आचार्य अत्रे ४ महिने स्थानबद्ध होते. या काळात शिरीष पै यांनी ‘नवयुग’ची जबाबदारी अत्यंत कौशल्याने सांभाळली. अत्रे ‘मराठा’ या वृत्तत्रातून आक्रमकपणे विचार मांडत असताना शिरीष पै तेथे पत्रकार म्हणून काम करत होत्या. यावेळेस पै यांच्या लिखाणातील वेगळेपणासोबतच समाजसेवेचे अंगही सर्वांसमोर आले.

शिरीष पै यांचे ‘एक तारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचक्र’ या कवितासंग्रहाला वाचकांनी भरभरून प्रेम दिले. ‘लाल बैरागीण’, ‘हे ही दिवस जातील’ या कादंबऱ्याही लोकप्रिय झाल्या. ‘आईची गाणी’, ‘बागेतील जमती’ या बालसाहित्यासोबतच आजचा दिवस, आतला आवाज, अनुभवांती, प्रियजन हे ललित साहित्य, चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे कथासंग्रह आणि हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती, या नाटकांतून शिरीष पै यांच्या लेखनसामर्थ्याची कल्पना येते.

वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात मुक्त वावर करणाऱ्या एका हरहुन्नरी लेखिकेने अखेरचा श्वास घेतल्याने साहित्य विश्व शोकमग्न झाले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा