Advertisement

गौरींच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज!


गौरींच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज!
SHARES

गणपतीचं उत्साहात स्वागत झाल्यानंतर आता माहेरवाशीणीला ओढ लागलीये ती गौरीच्या आगमनाची. यावर्षी २९ ऑगस्टला गौरींचं आगमन होणार आहे.

गौरीच्या तयारीसाठी पुन्हा एकदा बाजारपेठा भरल्या आहेत. गौरीचे मुखवटे, विविध दाग-दागिने, साड्या घेण्यासाठी बायकांनी दादरचं साडीघर गाठलय. सोमवारी पाऊस असताना देखील महिलावर्ग अगदी मनमुराद गौरींसाठी खरेदी करत होत्या.

आम्ही आमच्या कारागिराकडून आम्हाला हवा तसा मुखवटा तयार करून घेतो. गेले १० ते १५ वर्ष आमच्याकडे वर्षाचे १२ ही महिने गौरीचे मुखवटे, मूर्ती विकल्या जातात. आमच्याकडील लाकडी गौरीची खासियत म्हणजे संपूर्ण मूर्ती एकाच लाकडातून तयार केली जाते. यावर्षी आमच्या गौरीच्या मूर्ती कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातही गेल्या आहेत. 

राजन राऊत, साडीघर, दादर

गौरीच्या दिवसात हमखास खरेदी केली जाते, ती गौरीच्या मुखवट्यांची. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, लाकडी, कापडी अशा गौरीच्या संपूर्ण मूर्ती, मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात या मूर्ती, मुखवटे तयार करून मिळतात. २५० रुपयांपासून ते ५५० रुपयांपर्यंत हे मुखवटे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र अनेक वर्ष टिकणाऱ्या लाकडी मुखवट्याची किंमत ५५ हजार रूपये आहे. तर  प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या संपूर्ण मूर्तीची किंमत १८ हजार आहे.



आम्ही मागणी तसा पुरवठा करतो. ग्राहक सांगतील त्या आकारात, त्यांना हव्या डिझाईनमध्ये आम्ही गौरींसाठी साडी तयार करत असतो. नऊवारी आणि ब्राह्मणी पध्दतीच्या साडयांना दरवर्षीच मागणी जास्त असते. आम्ही अगदी अडीच इंचापासून ८ फुटांपर्यंत मूर्ती तयार करून देतो. फायबरच्या गौरींना जास्त मागणी असते. 

गौतम राऊत, साडीघर, दादर


आमच्याकडे उभ्या गौरी असतात. आम्ही एक वर्षाआड नवीन मुखवटा घेत असतो. मूर्तीची खरेदी करताना एक वेगळंच समाधान मिळतं. मी दरवर्षी एक नवा दागिना आणि साडी खरेदी करते. 

राजश्री गडकरी, ग्राहक



का बसवतात गौरी?

गौरी ही संपत्तीची देवता आणि लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. फार पूर्वी दानवांचे राज्य होते. त्यामुळे सर्व देवांच्या स्त्रियांना आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व स्त्रियांनी एकत्र जमून मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्यांच्यावर आलेले संकट टळले, अशी आख्यायिका आहे. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो.

प्रत्येकाची गौरी बसवायची पद्धत वेगळी असते. कोकणस्थ लोकांमध्ये खड्याच्या गौरी बसवतात. तर अनेक घरांमध्ये तांदळाच्या गौरी असतात. गौरीपुढे तांदळाची ओटी भरली जाते. हळद-कूंकू, गंध, फुलं, अक्षता, आघाडा, दुर्वा यांनी गौरीची पूजा केली जाते.



हेही वाचा

अजूनही तिथे 125 वर्षांपूर्वीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होतो!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा