Advertisement

अजूनही तिथे 125 वर्षांपूर्वीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होतो!


अजूनही तिथे 125 वर्षांपूर्वीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा होतो!
SHARES

डिजेचा दणदणाट, नृत्याचा धिंगाणा, मंडळांमध्ये वाढलेली स्पर्धा, उंच मूर्ती, भाविकांची गर्दी आणि ग्लॅमरचा तडका, हे चित्र दरवर्षी गणेशोत्सवात पाहायला मिळते. हल्ली एकप्रकारे उत्सवांना 'इव्हेंट'चे स्वरूप आले आहे. मात्र या सगळ्यात आजही सण-उत्सवांचे महत्त्व जाणून पारंपरिक पद्धतीने, साधेपणाने आणि मूळ उद्देश जपत गणेशोत्सव साजरा करणारी अनेक सार्वजनिक मंडळे आहेत. त्यापैकीच एक आहे गिरगावातील केशवजी नाईक चाळीतले मंडळ. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा आदर्श ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा केशवजी नाईक चाळीने जोपासली आहे.



समाजात एकी निर्माण व्हावी या उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत यासाठी प्रेरणा दिली. टिळकांच्या उद्देशाने प्रेरित होऊन 1893 साली केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यावर्षी केशवजी नाईक चाळीतील मंडळाला 125 वर्षे पूर्ण झाली.



लोकमान्य टिळकांची केशवजी चाळीतील पहिली भेट

लोकमान्य टिळक 1901 साली गणेशोत्सवादरम्यान मुंबईत एका सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी केशवजी चाळीतील बाप्पाला भेट दिली होती. फक्त भेटच नाही, तर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते. लोकमान्य टिळकांच्या केशवजी नाईक भेटीचा वृत्तांत केसरीमध्ये देखील प्रसिद्ध झाला होता. ‘मुंबईचा गणपती उत्सव’ या नावाने या भेटीचे वर्णन केसरीमध्ये प्रकाशित झाले होते.



साधेपणा हेच उत्सवाचे वैशिष्ट्य

125 वर्षे उलटल्यानंतरही या मंडळाने गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाची कास सोडलेली नाही. डिजेचा दणदणाट, प्रसिद्धीच्या वलयात आणि गगनाला भिडलेल्या मूर्तींच्या उंचीत या मंडळाने आजही साधेपणा जपलेला आहे. हे मंडळ गेल्या 125 वर्षांपासून एकाच आकाराची म्हणजे दोन फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. गणपतीचे आगमन आणि विसर्जन पालखीतून केले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाळीतील सर्व रहिवासी मिरवणुकीत अनवाणीच सहभागी होतात.


दहा दिवस बाप्पा आमच्या चाळीत विराजमान होतो. पारंपरिक पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. ना डिजेचा दणदणाट, ना कोणता दिखाऊपणा. प्रवचन, व्याखानमाला, किर्तन यांचे आयोजन केले जाते. यावर्षी मुलांसाठी स्पेशल कोणता कार्यक्रम ठेवला नाही. पण संध्याकाळी बुद्धीला चालना देणारे छोटे खेळ आयोजित केले आहेत.

विश्वास सातपुते, विश्वस्त, एसजीएस



1992 साली या मंडळाने शताब्दी वर्षे साजरे केले. पुण्यातल्या एका अभिनेत्याने लोकमान्य टिळकांची हुबेहुब वेशभूषा केली होती. लोकमान्य टिळकांसारखे त्यांनी भाषणही दिले होते. या प्रसंगाबाबत सांगताना 90 वर्षांच्या कुसुम गोगटे जुन्या आठवणींना उजाळा देतात. 


पुण्यातल्या त्या अभिनेत्याने अगदी हुबेहुब टिळकांची व्यक्तिरेखा साकारली होती. आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो होतो. 1901 साली टिळक घोडागाडीतून आले होते. तसाच प्रवेश या अभिनेत्याने केला. फक्त एवढेच नाही, तर त्याच्या बाजूला इतर कलाकारही होते ज्यांनी ब्रिटिशांची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यावेळी या कलाकाराचे खूप कौतुकही झाले होते. 

कुसुम गोगटे, सदस्य, एसजीएस



केशवजी नाईक चाळीतल्या बाप्पाला अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी भेट दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राम शेवाळकर यांनी इथे आयोजित व्याख्यानात मार्गदर्शनही केलेले आहे.



साधेपणा आणि परंपरा जपूनही गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण केशवजी नाईक चाळीतल्या मंडळाने ठेवले आहे. यांचा आदर्श इतर मंडळांनी घेतला तर उत्सवांमधील आत्मा जिवंत राहील, हे नक्की.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा