Advertisement

अंगारकीला सिद्धिविनायक दर्शनासाठी भाविकांसाठी विशेष व्यवस्था


अंगारकीला सिद्धिविनायक दर्शनासाठी भाविकांसाठी विशेष व्यवस्था
SHARES

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थीला दरवर्षी किमान 10 ते 12 लाख भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतात. मंगळवारी 13 जूनला अंगारकी संकष्टी असल्याने मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. 

दर्शनाच्या रांगेतील भाविक पावसात भिजू नयेत, म्हणून दर्शन रांगेला आच्छादन लावण्यात आले आहे. त्याचसोबत महिला आणि पुरुष भाविकांना मुख दर्शनासाठी एस. के. बोले मार्गावरील आगार बाजार ते सिद्धिविनायक प्रवेशद्वार क्रमांक 1 मधून प्रवेश दिला जाणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगांची योजना मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. पुरुषांसाठी शंकर घाणेकर मार्ग सयानी रोडवरील रविंद्र नाट्य मंदिर येथील पद्पथावरुन रेलिंगमधून नर्दुला टॅंक मैदानामधील मंडपामधून प्रवेश दिला जाणार आहे. महिलांना शंकर घाणेकर मार्गे काकासाहेब गाडगीळ मार्गावरील कॉन्व्हेंट हायस्कूलसमोर उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून रिद्धी चेकपोस्टमधून बाप्पांच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, बाप्पांच्या दर्शनाची वेळ सोमवारी 12 जूनला मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून पहाटे 3.15 वाजेपर्यंत, पहाटे 3.50 पासून रात्री 9 वाजेपर्यंत आणि रात्री 10.30 ते रात्री 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. भाविकांनी बाप्पांच्या दर्शनासाठी येताना कोणत्याही मौल्यवान वस्तू आणू नयेत, दर्शनासाठी येताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आत घेऊन जाणे टाळावे, प्रसादासाठी कोणतेही पदार्थ आणताना धातूचे डबे न आणता प्लास्टिकचे डबे आणावेत, अशा सूचना मंदिर न्यासाकडून भाविकांना देण्यात आल्या आहेत. मंदिर न्यासाकडून बाप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी मोफत बस सेवेची सोयही करण्यात आली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी मोफत वातानुकूलित बस सेवा -
सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मोफत वातानुकूलित बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. ही बस सेवा कबुतरखाना, दादर ते रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी दरम्यान धावेल. सोमवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही बससेवा उपलब्ध असेल. यामध्ये तीन मध्यम, तर तीन मोठ्या अशा एकूण 6 बस वापरण्यात येतील. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मंदिरापर्यंत पोहोचताना भाविकांची खूप गैरसोय होते, त्यांना वेळेत टॅक्सी मिळत नाही. पावसात भिजतच मंदिरात यावे लागते. त्यामुळेच मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन भाविकांसाठी मोफत बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
- संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धिविनायक मंदिर प्रशासन

अंगारकीसाठी मेट्रो-3 चे काम दोन दिवस बंद-

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 चे काम सध्या वेगात सुरू असून ही मेट्रो सिद्धिविनायक मंदिर परिसरातूनही धावणार आहे. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराजवळच्या नर्दुल्ला टँक आणि साने गुरूजी मैदानात मेट्रो-3 चे काम जोरात सुरू आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त दरवर्षी मंदिर न्यासाकडून नर्दुल्ला टँक आणि साने गुरूजी मैदानात मंडप टाकून पुरूष भाविकांना रांगेत उभे राहण्याची सोय करुन दिली जाते. पण मेट्रो-3 च्या कामामुळे पुरूष भाविकांची सोय कशी आणि कुठे करायची? असा प्रश्न मंदिर न्यासासमोर होता. पण मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन (एमएमआरसी)ने अंगारकी संकष्टीसाठी दोन दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भक्तांसह मंदिर न्यासाला दिलासा मिळाला आहे.
मंदिर न्यासाने 'एमएमआरसी'च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधून मैदान खुले करण्याची मागणी केली होती. ही मागणी त्वरीत मान्य करून 'एमएमआरसी'ने सोमवार आणि मंगळवार (12 आणि 13 जून) असे दोन दिवस काम बंद ठेवल्याची माहिती मंदिर न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा