Advertisement

मुंबईतील १४ शाळांमध्ये 'अटल टिंकरिंग लॅब'


मुंबईतील १४ शाळांमध्ये 'अटल टिंकरिंग लॅब'
SHARES

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील १४ शाळांना यामध्ये स्थान मिळाले आहे, तर महाराष्ट्रातील एकूण ११६ शाळांचा समावेश आहे. नीती आयोगाने नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने अटल टिंकरिंग लॅब उभारण्यात येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजवणे आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना २० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता ६वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी देशातील ९२८ शाळांचा या अभिनव योजनेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ७५ शाळांचा समावेश होता. आता महाराष्ट्रातील १९१ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील ३८८ जिल्हे आणि ७९ स्मार्ट शहरातील २ हजार ४३२ शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे.


सुरक्षित प्रयोगांसाठी दक्षता

या प्रयोगशाळांमध्ये सहावी ते बारावीमधील कोणताही विद्यार्थी प्रयोग करू शकतो. तसंच जिल्ह्यातील जिज्ञासू विद्यार्थ्यांनाही पूर्वपरवानगीने संधी मिळू शकेल. इलेक्‍ट्रॉनिक पार्टस्‌, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, थ्री-डी प्रिंटर, ड्रोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, रोबोटिक्‍स किट्‌स, ८ प्रकारचे सेन्सर्स, सेफ्टी गॉगल्स यांसह अनेक प्रकारचे साहित्य असून त्यातून प्रयोग करता येतील. सुरक्षित प्रयोग कसे करावेत? याची दक्षता घेतली जाणार आहे.


मुंबईतील १४ शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा

नीती आयोगाने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११६ शाळांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ११ शाळांचा समावेश आहे, तर मुंबई शहरमधील १० शाळा तर त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील १० शाळांचा समावेश आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा