विद्यार्थिनींच्या खात्यात ५ हजार होणार जमा, पालिका अर्थसंकल्पात तरतूद

यंदा प्रथमच सर्व पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने समुपदेशकाची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

SHARE

सोमवारी ४ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी २७३३.७७ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात विविध शैक्षणिक बाबींवर भर देण्यात आला असून मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात प्राथमिक स्तरावर ७.२६ कोटी आणि माध्यमिक स्तरावर ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  त्याशिवाय येत्या शैक्षणिक वर्षासाठी ६ हजार ६६६ सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून यासाठी २४.३० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.


शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड आणि शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी यंदाच्या शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच सर्व पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने समुपदेशकाची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय शाळेमध्ये ३८१ सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उभारण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर २.४३ कोटी आणि माध्यमिक स्तरावर १.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


क्रीडा, संगीत अकादमी

येत्या शैक्षणिक वर्षात विविध नवीन प्रकल्प व योजना सुरू करण्यात येणार आहे. यात आंतरराष्ट्रीय शाळा २.६० कोटींची तरतूद, भाषा प्रयोगशाळा १.३० कोटींची तरतूद, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब १.४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी प्रमाणे येत्या वर्षातही सर्व शाळांमध्ये क्रीडा व संगीत अकादमी सुरू करण्यात येणार असून यासाठी प्रत्येकी ३.७६ कोटी व ८६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.


कुतूहल भवनांची उभारणी

विद्यार्थ्यांसाठी नव्याने विज्ञान कुतूहल भवनांची उभारणी केली जाणार असून त्यासाठी १.२० कोटी देण्यात येणार आहे. हे भवन पूर्व व पश्चिम उपनगरात होणार आहे. तसंच विद्यार्थ्याना दिवाळी व उन्हाळी सुट्टीत गुंतवून ठेवण्यासाठी बालभवनमध्ये विद्यार्थ्यांना सुताराकाम, नळजोडणी, मातीचे काम, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचं मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यासाठी १२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.


शाळांना नवी ओळख

तसंच १३०० शाळांच्या वर्गखोल्या डिजीटल करण्यात येणार असून ई-ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा यासारख्या विविध योजनांसाठी तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तसेच प्रोग्रामिंग, प्रिंटिंग इलेक्ट्रॉनिक रोबो मोबाईल अॅपही विकसित करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी १.४२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या सर्व शाळांना नवी ओळख मिळावी यासाठी आले या इमारतींचे दुरुस्ती काम हातात घेण्यात येणार आहे. यामुळे सर्व महापालिका शाळांची वेगळी ओळख विशिष्ठ रंगांद्वारे होणार असून यासाठी तपकिरी - पिवळा या रंगाचा संगम असलेली रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यासाठी २०१.७३ कोटींची तरतूद येणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या महत्वाकांक्षी असलेल्या वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन दर्शनासाठी दरवर्षी महापालिका विद्यार्थ्यांची वार्षिक सहल काढण्यात येणार असून त्यासाठी विशेष निधी दिला आहे.हेही वाचा -

पब्जी गेम बंद करा! ११ वर्षाच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना साकडं

शिक्षणासाठी यंदा २ हजार ७३३ कोटींची तरतूदसंबंधित विषय
ताज्या बातम्या