Advertisement

विद्यार्थ्यांनो, वाचाल तर वाचाल ....!


विद्यार्थ्यांनो, वाचाल तर वाचाल ....!
SHARES

'वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या सोशल मीडियाच्या युगात थोडीशी हरवल्यासारखी झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण निरीक्षक कार्यालय उत्तर विभागाने पुढाकार घेत ग्रंथ महोत्सवाचं आयोजन केलं आहे. विद्यार्थ्यांचं वाचन वाढून वाचन संस्कृतीचं संवर्धन व्हावं, यासाठी शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाने मुंबईत १ आणि २ फेब्रुवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचं आयोजन केलं आहे.



या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार करणार आहेत. कुर्ला येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये होणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन संस्कृतीवर टॉक शो, परिसंवाद, चर्चासत्र, विद्यार्थी आणि शिक्षकांचे काव्यसंमेलन तसेच शाळांना पुस्तक खरेदीसाठी विविध प्रकाशक पुस्तक दालन ठेवणार आहेत.


विविध कार्यक्रमांची रेलचेल

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ग्रंथ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. पहिल्या दिवशी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडी निघणार असून विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक या ग्रंथदिंडीत सहभागी होतील. त्यानंतर ग्रंथदालनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

या ग्रंथ महात्सवाच्या दुसऱ्या दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाला शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीही लाभणार असल्याची माहिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली. या ग्रंथ महोत्सवाला उत्तर विभागातील शाळांनी सहभागी होण्याचं आवाहन शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा