Advertisement

राज्यभरातील काॅलेज १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु होणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.

राज्यभरातील काॅलेज १५ फेब्रुवारीपासून होणार सुरू
SHARES

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु होणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केली.

महाविद्यालये सुरु करताना कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यात यावं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित आणि आरोग्याची काळजी घेऊन विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्के बंधनकारक न करता उपस्थितीसंदर्भात ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत १ फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतिगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी. अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा- महापालिकेच्या शाळा होणार आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ५ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून, ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

राज्यातील प्रतिबंधित प्रक्षेत्रातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त, महानगरपालिका/नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याअंतर्गत येतात, त्यांच्याशी संबंधित विद्यापीठाने विचारविनिमय करावा. कोविड-१९ च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करुन नियमित वर्ग घेण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतिगृहाचे इलेक्ट्रिक व सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आलं आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

(colleges will start in maharashtra from 15th february 2021 says uday samant)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा