Advertisement

प्राध्यापक आंदोलनाला मुंबईत समिश्र प्रतिसाद, तावडेंचं फक्त आश्वासन


प्राध्यापक आंदोलनाला मुंबईत समिश्र प्रतिसाद, तावडेंचं फक्त आश्वासन
SHARES

मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास मुंबई वगळता इतरत्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी लेखी आश्वासन मिळेपर्यंत कामबंद आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय प्राध्यापकांनी जाहीर केला आहे.


मुंबईत प्रतिसाद नाही

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यातील प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. एमफुक्टो या संघटनेने या कामबंद आंदोलनाची हाक दिली असली तरी इतर संघटनांनी मात्र यात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत रुईया कॉलेज, किर्ती कॉलेज, सोमय्या कॉलेज यांसह मुंबईतील इतर ठिकाणी या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र कोल्हापूर, पुणे आणि इतरत्र चांगला प्रतिसाद मिळाला. प्राध्यापकांच्या या आंदोलनाची दखल घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात बैठक बोलवली होती.


अंतिम निर्णय कधी?

प्राध्यापकांच्या आंदोलनाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सर्वच संघटनांना आमंत्रित करण्यात आलं होतं. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्वरित त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिलं. इतर प्रश्नासंदर्भात वित्त विभागाकडे अहवाल पाठवण्यात येईल, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

शिक्षणमंत्र्यांच्या या आश्वासनावर एमफुक्टो संघटनेचे समाधान झालेलं नाही. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असं संघटनेने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, प्राध्यापकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवारी सविस्तर चर्चा झाली. या सगळ्या विषयांमध्ये शासन सकारात्मक रीतीनं विचार करत असल्याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. बैठकीतील लिखित मिनीट्स दोन्ही संघटनांना दिले जातील. सरकारची सकारात्मक भूमिका लक्षात घेऊन प्राध्यापकांचा बेमुदत संप मागे घेतला जाईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.


'या' प्रमुख मागण्या

  • प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती सुरु करावी.
  • नव्यान लागू झालेल्या विद्यापीठ कायद्यात समाविष्ट अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करव्यात.
  • तासिका तत्वावरील प्राध्यापकांची वेतनवृद्धी, वेतनेतर अनुदान, सातवा वेतन आयोग, आंदोलक प्राध्यापकांचे रोखलेले वेतन यासारख्या मागण्या पूर्ण करव्यात.

या आंदोलनात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून इतर संघटनांनी यात भाग घेतलेला नाही. कायम सामूहिक रजा, काम बंद आंदोलन, परीक्षा बहिष्कार अशा पद्धतीची आंदोलनं करून शिक्षकांसह विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं.
- डॉ. वैभव नरवडे, मुंबई अध्यक्ष, मुक्ता संघटना

गेल्या वेळीही शिक्षक अशा आंदोलनाला बळी पडल्यानं त्या आंदोलन काळातील ७१ दिवसांचे वेतन अद्याप प्रलंबित आहे. कामबंद असल्याने जर सेवेमध्ये खंड पडला तर याची जबाबदारी आंदोलन करणारी संघटना घेणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा