'इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया'तर्फे (आयसीएसआय) शुक्रवारपासून (२० डिसेंबर) कंपनी सेक्रेटरी (सीएस) परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ऐनवेळी या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. कंपनी सेक्रेटरी परीक्षेच्या सुरुवातीचे २ दिवसांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. याबाबत 'आयसीएसआय'नं गुरुवारी जाहीर केलं असून, ऐनवेळी वेळापत्रकात बदल केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.
आयसीएसआयतर्फे २० ते ३१ डिसेंबर दरम्यान कंपनी सेक्रेटरी परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारीही पूर्ण केली. तसंच, परीक्षा केंद्रंही निश्चित करण्यात आली. मात्र, शुक्रवारपासून परीक्षा सुरू होणार असतानाच पहिले २ दिवसांचे पेपर पुढे ढकलण्यात आले असून, उर्वरित पेपर नियमित होणार असल्याची माहिती मिळते. सीए एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशन अशा २ स्तरावर ही परीक्षा घेण्यात येते. त्यात जुन्या व नव्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
परीक्षेतील २ दिवसांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी अद्याप त्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळं पेपर पुढे ढकलण्यात आल्याचं समजतं. परंतु, २ पेपर वगळता इतर पेपर वेळापत्रकानुसार होणार आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या पेपरचे सुधारित वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
हेही वाचा -
Video: आॅगस्ट क्रांती मैदानात एनआरसी, सीएए विरोधात एल्गार
मुंबई महापालिकेत १० रुपयात थाळी