Advertisement

महापालिकेकडून टॅबची खरेदी, पण नववीची मुलं राहणार वंचित


महापालिकेकडून टॅबची खरेदी, पण नववीची मुलं राहणार वंचित
SHARES

मुंबईतल्या पालिका शाळांमधील ९वीच्या मुलांना अखेर टॅब देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पण मागील वेळच्या टॅबच्या तुलनेत यावेळी दोन ते अडीच हजार रुपयांनी जास्त दराने टॅबची खरेदी केली जात आहे. ही खरेदी आता जानेवारी महिन्यात केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या टॅबचा पुरवठा पुढील तीन महिन्यांनंतरच केला जाणार आहे. तोपर्यंत सन २०१७-१८चं शैक्षणिक वर्षच संपुष्टात येणार असल्यानं यंदा नववीची मुलं टॅबपासून वंचितच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे.


मग काय उपयोग?

मुंबई महापालिका शाळांमध्ये सन २०१५-१६ आणि सन २०१६-१७मध्ये इयत्ता आठवीच्या मुलांना टॅब वाटप करण्यात आलं होते. त्यामुळे सन २०१७-१८मध्ये इयत्ता ९वीच्या मुलांना महापालिकेतर्फे मोफत टॅब देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सन २०१७-१८मध्ये मराठी, ऊर्दू, हिंदी आणि इंग्रजी या ४ माध्यमांच्या इयत्ता ९वीच्या मुलांना पाठ्यक्रम असलेले १८ हजार ७८ टॅब हे विमा आणि वॉरंटीसह खरेदी करून विद्यार्थी आणि शिक्षकांना देण्यात येणार आहेत. हेच टॅब सन २०१८-१९मध्ये इयत्ता १०वीच्या मुलांना पाठ्यक्रम टाकून देण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.


नववी आणि दहावीच्या मुलांना टॅब वाटप

त्यानुसार कार्वी मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीकडून या टॅबची खरेदी केली जात आहे. यासाठी प्रत्येक टॅबसाठी पाठ्यक्रमासह १० हजार ३१९ रुपये मोजले जाणार आहेत. त्यामुळे या १८,०७८ टॅबसाठी १८ कोटी ७० लाख ५२ हजार रुपये मोजले जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील वेळेस २२ हजार ७९९ टॅबची खरेदी केली होती. त्यावेळी प्रति टॅब साडेसात हजार रुपयांमध्ये खरेदी केला होता. पण हा टॅब आठवीच्या मुलांना देताना त्यातील पाठ्यक्रम वगळता टॅब पुढे नववीच्या मुलांना आणि नववीतून उत्तीर्ण झाल्यानंतर दहावीच्या मुलांना देण्यात येणार होता.


प्रशासनाने पुन्हा निविदा मागवायला हवी

त्यामुळे आठवीच्या मुलांसाठी हे टॅब खरेदी करून पुढे दहावीपर्यंत त्यांच्याकडे तीन वर्षे राहतील, असं नियोजन केलं असलं, तरी प्रत्यक्षात नववीच्या मुलांसाठी हे टॅब खरेदी करून एकप्रकारे गोंधळाचं वातावरण शिक्षण विभागाने निर्माण केलं आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या मते ९वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे नववीच्या मुलांना टॅब खरेदीत विलंब झाला. मात्र, प्रत्यक्षात या टॅबसाठी कोणतीही कंपनी यापूर्वी पुढे येत नसल्यामुळे अखेर निविदा अटींमध्ये बदल करत फेरनिविदा मागवण्यात आली. त्यात दोनच कंपन्यांनी भाग घेतला होता. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी टॅब हे मुलांना मिळायला हवेत, पण शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ते खरेदी करून काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या शैक्षणिक वर्षासाठी हे टॅब नववीच्या मुलांसाठी खरेदी केले जात आहेत, त्या मुलांना जर याचा लाभ मिळणार असेल, तर प्रशासनाने पुन्हा एकदा निविदा मागवून प्रयत्न करायला हवेत, असं त्यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा