Advertisement

मुंबईच्या शिक्षिकेचं नागपूर येथील समायोजन अखेर मागे

मुंबईच्या चेंबूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेत जयश्री ढोरे सरप्लस शिक्षिका म्हणून काम करतात. आपलं समायोजन थेट नागपूरच्या शाळेत करण्यात आल्याचं समजताच त्यांना धक्का बसला. याविरोधात त्यांनी पाठपुरावा केला.

मुंबईच्या शिक्षिकेचं नागपूर येथील समायोजन अखेर मागे
SHARES

तुम्ही मुंबईत काम करत आहात, तुमचा दिनक्रम अगदी व्यवस्थित सुरु आहे आणि तुम्हाला तुमच्या कामाबद्दल काहीही तक्रार नाही. पण अचानक तुमच्या हातात कागद पडतो की तुम्हाला नागपूरला कामावर रुजू व्हायचंय, कारण तिथे तुमची गरज आहे! हा प्रकार नुसता ऐकणंही तुमच्यासाठी अजब असू शकतं. पण, मुंबईच्या जयश्री ढोरेंच्या बाबतीत अगदी हेच घडलं. पण, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला आणि त्यांचं प्रस्तावित समायोजन मागे घेण्यात आलं.


मुंबईतून थेट नागपुरात समायोजन!

मुंबईच्या चेंबूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेत जयश्री ढोरे सरप्लस शिक्षिका म्हणून काम करतात. मात्र, त्यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले. ढोरे या मुंबईच्याच रहिवासी असून एम.एस.सी. बी.एड. शिक्षिका आहेत. मात्र, आपलं समायोजन थेट नागपूरच्या शाळेत करण्यात आल्याचं समजताच त्यांना धक्का बसला. याविरोधात त्यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला.

याबाबत शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक परिषद यांच्याकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले होते. ढोरे यांचे समायोजन मुंबईतील शाळांमध्येच करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मुंबईच्या सरप्लस शिक्षिका जयश्री ढोरे यांचं समायोजन ८०० किलोमीटर दूर नागपूरच्या शाळेत करण्यात आलं. त्या विरोधात आमदार कपिल पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला.


आमदार कपिल पाटील यांची स्थगन सूचना

आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत नियम ९३ अन्वये स्थगन सूचना दिली होती. सभापती रामराजे निंबाळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरत ही बदली अन्यायकारक असल्याचे सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपण तात्काळ हा अन्याय दूर करत असल्याचे आश्वासन दिले. नागपूरचे संस्थाचालक रिक्त जागांसाठी हायकोर्टात गेले होते. त्यामुळे, आम्हाला हे करावं लागलं, असं उत्तर शिक्षणमंत्र्यांनी दिलं.

शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन मिळाल्यानंतर थोडे हायसे वाटत आहे. यासाठी आम्ही खूप निवेदने दिली आणि त्यासाठी मला मदत करणाऱ्यांचे मी आभार मानते. यापुढेही समायोजन करताना शिक्षकांच्या आर्थिक, कौटुंबिक आणि इतर परिस्थितीचा विचार केला जाणे आवश्यक आहे.

जयश्री ढोरे, समायोजित शिक्षिका


शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

शिक्षण संस्थांना विहित कार्यपद्धतीद्वारे शिक्षक पदे भरण्याची परवानगी दिली असून, त्या निर्णयानुसारच हे समायोजन झाल्याचे तावडे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. ढोरे यांचे प्रकरण पुढे करून आणि या समायोजन प्रक्रियेचा अपप्रचार करून काही संस्थाचालकांना शिक्षक भरतीसाठी रान मोकळे करून देण्याचा प्रयत्न काही शिक्षक आमदार करीत असल्याची टीकाही यावेळी शिक्षणमंत्र्यांनी केली.


समायोजन प्रक्रिया म्हणजे काय?

राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी समायोजन प्रक्रिया राबवली जाते. खाजगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकसंख्या ठरवली जाते. अशा शाळांमध्ये जेव्हा एखादा शिक्षक अतिरिक्त ठरतो तेव्हा संबंधित शिक्षकाला काढून न टाकता दुसऱ्या शाळेत रिक्त पदावर पाठवण्यात येते. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संचमान्यतेनुसार राज्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा