Advertisement

ऐन परीक्षेत शाळांचे मूल्यमापन पुढे ढकलले!


ऐन परीक्षेत शाळांचे मूल्यमापन पुढे ढकलले!
SHARES

राज्यातील १०० टक्के शाळा समृद्ध व्हाव्यात या उद्देशाने शाळा सिद्धी हा राष्ट्रीय कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येतो. यानुसार शाळांनी आपापल्या स्तरावर स्वतःचे मूल्यमापन पूर्ण झाल्यावर विद्या प्राधिकरणाद्वारे शाळांचे मूल्यमापन करायची प्रक्रिया या आठवड्यात करण्यात येणार होती. मात्र शाळा सिद्धी मूल्यमापनाचा घाट ऐन परीक्षेच्या काळात घातला जातोय, अशी ओरड सुरू झाल्यावर या शाळांचे बाह्यमूल्यमापन राज्याच्या विद्या प्राधिकरणाने पुढे ढकलले आहे.


शाळांच्या मूल्यमापनात विद्यार्थी वेठीस

शाळा सिद्धी उपक्रमाच्या स्वयं मूल्यमापनात अ श्रेणी प्राप्त झालेल्या राज्यभरातील शाळांची संख्या ३४ हजार ४९१ असून १० ते १७ फेब्रुवारी या कालावधीत त्यांचे बाह्य मूल्यमापन विद्या प्राधिकरणाद्वारे होणार होते. बाह्य मूल्यमापन करण्यासंदर्भातील राज्याची नियोजन कार्यशाळाही पार पडली होती. जिल्हानिहाय शाळांचे नियोजन तसेच वेळापत्रक प्राधिकरणाने दिले होते. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावरच हे मूल्यमापन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर त्याचा परिणाम होणार होता. यामध्ये विद्यार्थी वेठीस धरले जात असल्याने हे मूल्यमापन परीक्षेच्या नंतर घेण्यात यावे, अशी मागणी राज्यभरातील शिक्षण संस्थांकडून तसेच मुख्याध्यापकांकडून करण्यात आली होती.


काय आहे शाळासिद्धी मूल्यांकन?

शाळांच्या दर्जानुसार त्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार शाळा सिद्धी ही प्रणाली तयार करण्यात आली. शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षकांचा दर्जा, गुणवत्ता यांच्या आधारे शाळांचे मूल्यमापन करून त्यांना अ ते ड अशा श्रेणी देण्यात आल्या. अ दर्जाच्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी, तपासणी शासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार होती. आतापर्यंत एकूण १ लाख ९ हजार ९८ शाळांपैकी ९९ हजार ६५० शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा