Advertisement

अतिरिक्त गुणांसाठी मुदतवाढ, इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा!


अतिरिक्त गुणांसाठी मुदतवाढ, इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा!
SHARES

इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र, गुण देण्याची पद्धत आणि या संदर्भातील अटींविषयी तक्रारी आल्यानंतर आता शासनाने सुधारित निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थी निव्वळ इंटरमिजिएट उत्तीर्ण असला, तरी त्यास सवलतीचे गुण मिळणार आहेत. मात्र, ही सवलत केवळ एकाच वर्षासाठी असून पुढील वर्षी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.


एलिमेंटरीची अट पुढच्या वर्षीपासून

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निर्णयानुसार ‘एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय विद्यार्थ्याला इंटरमिजिएट ड्रॉर्इंग परीक्षेचे अतिरिक्त गुण दिले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला होता. पण यात आता बदल करण्यात आला असून केवळ इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यालाही सात गुण दिले जाणार आहेत. एलिमेंटरी परीक्षा न देताही आता विद्यार्थी इंटरमिजिएटला अतिरिक्त गुणांचा लाभ होऊ शकतो.

मात्र, हा निर्णय केवळ एकाच वर्षासाठी ठेवण्यात आला असून २०१९च्या मार्च महिन्याच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.


प्रस्तावासाठी मुदतवाढ

शाळांकडून सवलतीचे गुण देण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या वेळापत्रकातही मुदतवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत सादर करायचे होते. ते आता १० जानेवारीपर्यंत सादर करायचे आहेत. तर शाळांना विभागीय मंडळाकडे २० जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करायचे आहेत.


म्हणून या निर्णयात बदल

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जात असल्याने निकालाचा फुगवटा वाढल्याची ओरड होते. शिक्षणक्षेत्रातून याविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कला क्षेत्राशी निगडित विद्यार्थ्याला दहावीत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, असे करताना काही अटी लादण्यात आल्या होत्या. त्यास कलाशिक्षकांच्या संघटनांनी वारंवार विरोध करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार या निर्णयात काही अंशी बदल करण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा