Advertisement

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, तांत्रिक कारणास्तव दुसरी यादी पुढे ढकलली


अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, तांत्रिक कारणास्तव दुसरी यादी पुढे ढकलली
SHARES

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला असून सोमवारी १६ जुलैला जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या गुरुवारी १९ जुलेला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही यादी पुढे ढकलली गेल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.


२ लाख १२ हजार ५९३ जागा शिल्लक

अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाइन जागा, इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यासह एकूण २ लाख १२ हजार ५९३ जागा शिल्लक आहेत. अकरावीसाठी अर्ज केलेल्या २ लाख ३ हजार १२० विद्यार्थ्यांपैकी दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ५२ हजार १९४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा बायफोकलसह एकूण प्रवेश प्रक्रियेसाठी २ लाख ९८ हजार ४०५ जागा उपलब्ध आहे.


मुसळधार पावसाचा फटका

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर करण्यात आली होती. या यादीत मुंबई विभागातून १ लाख २० हजार ५६६ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते. यापैकी ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. ही यादी जाहीर झाल्यानंतर ६ ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना संबधित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन दिवस वाढवून देण्यात आलं. या मुदतवाढीचा सर्वाधिक फायदा मुंबई विभागातील विद्यर्थ्यांना झाला. बुधवारी ११ जुलैला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तब्बल २ हजार २२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.


अकरावी प्रवेशाचा गोंधळ

मुसळधार पावसामुळे प्रवेश घेण्यास दिलेली मुदतवाढ आणि नुकताच झालेला तांत्रिक बिघाड यामुळे पदवी प्रवेश प्रक्रियेप्रमाणे अकरावीच्या प्रवेशाचा गोंधळ होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. दरम्यान आत्तापर्यंत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या विभागांतून मिळून ९५ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश निश्चित केले आहेत.


हेही वाचा - 

एफवायची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर

मुंबई विद्यापीठाचे आणखी ३ निकाल जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा