Advertisement

शाळांमध्ये डिजिटायझेशनची गरज- राज्यपाल


शाळांमध्ये डिजिटायझेशनची गरज- राज्यपाल
SHARES

युनिसेफच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘जगातील लहान मुलांची सद्यस्थिती २०१७’ या अहवालाच्या डिजिटल आवृत्तीचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते राजभवन इथं झालं. डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत तसेच शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व गुणवत्ता सुधार, आरोग्य सेवा विस्तार या क्षेत्रात देखील क्रांतिकारी बदलाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान सर्व मुलांना सहजतेने उपलब्ध झालं पाहिजे, असं मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला धारावी येथे राहणाऱ्या झुबेरी अन्सारी या मुलीने व जयंती शर्मा या मुलाने डिजिटल तंत्रज्ञानामुळे लहान मुलांचे विश्व कसं बदलत आहे व त्यातून कसे सकारात्मक बदल घडत आहेत याविषयी आपले अनुभव सांगितले. राज्यपालांच्या हस्ते ‘हम भी फरिश्ते है’ या मुलांविरुद्ध हिंसा थांबविण्याचा संदेश देणाऱ्या अॅनिमेशनपटाचं प्रकाशन करण्यात आलं.


सकारात्मक डिजिटल कंटेन्टची गरज

समाज माध्यमांमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य तसेच हानिकारक दृकश्राव्य गोष्टी मुक्तपणे उपलब्ध आहेत. हे चित्र बदलून लहान मुलांना सकारात्मक, योग्य व सुरक्षित अश्या प्रकारचे डिजिटल कंटेन्ट उपलब्ध झालं पाहिजे याकरीता सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचार मंथन करून उपाय योजना केली पाहिजे. शाळांमध्ये देखील डिजिटल साक्षरता निर्माण केली पाहिजे असं, त्यांनी सांगितलं.


डिजिटायझेशन वरदान आणि अभिशाप

डिजिटल माध्यमातून लहान मुलांचं शोषण, त्यांच्याविरुद्ध हिंसा व मुलांचा व्यापार होत आहे. त्यामुळे लहान मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी शाळा, आश्रमशाळा, अनाथालय, सुधारगृह, इत्यादी याठिकाणी मुलांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्याची सूचनाही राज्यपालांनी केली.

डिजिटल युगात लहान मुलांची सुरक्षा ही शासनाशिवाय समाज, खासगी क्षेत्र आणि खासकरून तंत्रज्ञान आणि दूरसंचार उद्योग यांची देखील जबाबदारी आहे. या सर्वांच्या प्रयत्नातूनच मुलांसाठी सुरक्षित व सहज उपलब्ध असणारे डिजिटल विश्व निर्माण करता येईल असं त्यांनी सांगितलं.

जगात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांपैकी प्रत्येक तिसरी व्यक्ती १८ वर्षांखालील आहे. डिजिटल तंत्रज्ञान हे वरदान आहे, मात्र ते अभिशाप देखील ठरू शकते. त्यामुळे मुलांची डिजिटल साक्षरता होणे गरजेचं असल्याचे मत युनिसेफच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रमुख राजश्री चंद्रशेखर यांनी व्यक्त केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा