आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका सीनिअर विद्यार्थ्याकडून हा लैंगिक छळ केला जात असल्याचा आरोप काही विद्यर्थ्यांनी केला आहे. शिवाय फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
सदर विद्यर्थ्याने फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवर आपल्यासोबत झालेला सर्व प्रकार सविस्तरपणे मांडला आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये आम्हाला कशाप्रकारे टार्गेट केलं जातं यासंबंधी सविस्तरपणे सांगितलं आहे. तसंच आरोपी विद्यार्थी हा फक्त तरुण आणि फ्रेशर्सना टार्गेट करतो. त्याने लैंगिक छळच नव्हे तर लैंगिक अत्याचारही केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
आरोपी विद्यार्थी हा आयआयटी बॉम्बेमध्ये इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जींनी त्याला 'मूड इंडिगो' या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणून नियुक्त केलं होतं. मेंटॉर म्हणून नवीन विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासक्रमबाबत मार्गदर्शन करण्यची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. आणि त्यादरम्यान आरोपीने लैंगिक छळ केल्याचा दावा या विद्यर्थ्यांनी केला आहे.
तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्याप्रमाणे अन्य १५ जणांचाही गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लैंगिक छळ सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा आकडा अजून मोठा असण्याची शक्यताही त्याने व्यक्त केली आहे. आयआयटी बॉम्बेच्या शिस्तपालन समितीकडे यासंबंधी काही विद्यार्थ्यांनी तक्रारही केली होती. मात्र परिस्थितीजन्य पुरावे पुरेसे नसल्याचं सांगत या आरोपी विद्यार्थ्याचं निलंबन करता येणार नाही, असं व्यवस्थापनाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. तसच येत्या काही दिवसात आरोपी विद्यार्थ्यावर कारवाई झाली नाही, तर पदवीदान संमारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही काही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात मुंबई लाइव्हने आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी प्रसूती रजेवर असून मला याबाबत काहीही माहीत नाही, तसंच याबाबत आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जी म्हणाले गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असून मी आजच कामावर रुजू झालो आहे. त्यामुळे मला घडलेल्या प्रकारबाबत काहीच माहिती नाही, असंही त्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.