गांधी, टिळक, नेहरू 'अॅन्टी सेक्युलर'?

 Kalina
गांधी, टिळक, नेहरू 'अॅन्टी सेक्युलर'?
Kalina, Mumbai  -  

देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महापुरूषांच्या विरोधात सध्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात चुकीचा मजकूर छापून यायची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असाच एक वादग्रस्त मजकूर 'एमए'च्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात छापण्यात आलेला असून त्यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

राज्यशास्त्राच्या पुस्तकात महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल 'अॅन्टी सेक्युलर' अर्थात 'धर्मनिरपेक्षतेला विरोध करणारे', असे शब्द वापरले आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत 'एनएसयूआय'तर्फे काही विद्यार्थ्यांनी कालिना कॅम्पसमध्ये एक दिवसीय उपोषण केले.

हे पुस्तक गेल्यावर्षी छापण्यात आले होते. त्यावेळी 'एनएसयूआय'ने आंदोलनही केले. तसेच या पुस्तकातून वादग्रस्त मजकूर वगळण्याबाबत कुलगुरूंना अनेकवेळा निवेदनही देण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे यावर्षी तरी पुस्तकातून हा अाक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यात यावा आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव असिफ खान यांनी केली. पुस्तकातील अक्षेपार्ह मजकूर न वगळल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

बालगंगाधर टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू हे देशाचे हिरो आहेत. त्यांना 'अँटी सेक्युलर' म्हणणे म्हणजे त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. त्यांच्या सन्मानासाठीच आम्ही मैदानात उतरलो आहोत.
- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

Loading Comments