Advertisement

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
SHARES

चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.

सन २०१५ ते सन २०१९ या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी २.२५ पट अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त १.४५ पट अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत. तसंच एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी किंवा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे निदर्शनास आलं आहे. शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

२ लाख ५५ हजार अर्ज

आयटीआय प्रवेशप्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. यावरून नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचं निदर्शनास येतं.

हेही वाचा - जानेवारी ते डिसेंबर नवं शैक्षणिक वर्ष? राज्य सरकारचा विचार सुरू

प्रवेश प्रोत्साहन अभियान

आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी विभागामार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयटीआय संस्थेत दररोज समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपद्वारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. प्रवेश अर्ज मोबाईलद्वारे देखिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीची किंवा प्रादेशिक विभागनिहाय नेमून दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसंच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जीवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा