‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याची सुरूवात करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. (maharashtra government partnership with google classroom and google meet for online education)
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी गुगलने महाराष्ट्र शासनासोबत भागिदारी केली आहे. या भागिदारीमुळे राज्यातील २.३ कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गुगल क्लासरूम’, ‘गुगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यासंदर्भात अधिक बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपलं आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेलं असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवलं असा विचार आपण केला तर उद्याच्या गोष्टींची कोरोनाने आपल्याला आज ओळख करून दिली, असं म्हणावं लागेल. उद्याचं जग, उद्याची माध्यमे, उद्याचं शिक्षण कसं असेल याची जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचं स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणलं.
हेही वाचा - 'या' दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका
‘वर्क फ्रॉम होम’साठी सहकार्य
‘गुगल’च्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल. भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही ‘गुगल’ने सहकार्य करावं, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचं शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, ‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचं निरसन करू शकतात. कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार
सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचं आमचं लक्ष्य आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्याचंही शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
ठळक बाबी
• शिक्षणासाठी जी स्वीट : जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करतं.
• ‘गुगल क्लासरूम’ : जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधन, जे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करते, तसेच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करतं.
• ‘गुगल फॉर्म’ : एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देतं.
• असाइनमेंट्स : एक असे साधन जे शिक्षकांना लवकर आणि सुरक्षितपणे तयार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देतं.
हेही वाचा - Medical Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप नाहीच, राज्य सरकार मांडणार बाजू