Advertisement

एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा या स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारीत वेळापत्रक नुकतंच (mpsc exam new schedule declared) जाहीर केलं आहे.

एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर
SHARES

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगा या स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारीत वेळापत्रक नुकतंच (mpsc exam new schedule declared) जाहीर केलं आहे. हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची घोषणा केव्हा होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवार लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करा अशी मागणी एमपीएससीकडे करत होते. त्यानुसार आयोगाने परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

हेही वाचा - जुलैमध्ये जाहीर होणार १०वी व १२वीचा निकाल?

या सुधारीत वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात आयोगाने म्हटलं आहे की, नोवेल कोरोना (COVID-19) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व लाॅकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित एकूण ३ परीक्षा सार्वजनिक हितास्तव संदर्भाधीन प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढं ढकलण्यात आलेल्या आहेत. सदर परीक्षा खालील दिनांकास आयोजित करण्यात येतील.

  • जाहिरात क्रमांक-१९/२०१९- राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०- १३ सप्टेंबर २०२०
  • जाहिरात क्रमांक-५/२०२०- महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०- ११ आॅक्टोबर २०२०
  • जाहिरात क्रमांक- ६/२०२०- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- १ नोव्हेंबर २०२०

नोवेल कोरोना विषाणू प्रादुर्भावातील स्थिती संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना व लाॅकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल. तसंच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यासाठी उमेदवाराने संकेतस्थळाचं सतत अवलोकन करत राहण्याची सूचनाही आयोगाने केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा