महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC)कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षा देखील रद्द करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार होत्या. परंतु आता या परीक्षा कधी होणार? याबाबत योग्यवेळी जाहीर करण्यात येतील, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. याआधी राज्य सरकारने आॅक्टोबरमध्ये होणारी परीक्षा रद्द केली होती. (mpsc november exams postponed by maharashtra government)
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व परीक्षा पुढे न ढकलल्यास राज्यभर तीव्र उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा मराठा समाजातील नेत्यांनी दिल्यानंतर अखेर ११ आॅक्टोबर रोजी होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. शुक्रवार ९ आॅक्टोबर रोजी ताबडतोब मंत्रिमंडळ बैठक बोलावून हा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते.
हेही वाचा - MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाकाळात अभ्यासिका बंद असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार करून आम्ही ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा आता कधी होणार त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
मराठा समाजाकडून देखील आम्हाला परीक्षा पुढे ढकण्याची विनंती करण्यात येत होती. आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी परीक्षा नव्याने जाहीर होईल तेव्हा परीक्षेला बसू शकतील. या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही. मात्र आता जी पुढची तारीख जाहीर होईल, त्यामध्ये बदल होणार नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
तर, राज्य सरकारने केवळ एकाच जातीचा विचार करून एमपीएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, उर्वरीत ८५ टक्के विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला विचारला होता.