Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्टः 'त्या' शिक्षकाची केली बदली


मुंबई लाइव्ह इम्पॅक्टः 'त्या' शिक्षकाची केली बदली
SHARES

दहावीच्या परिक्षेत पदाधिकाऱ्याच्या मुलाला कॉपी करायला मदत करणारे आणि आपल्यासह इतर सहकाऱ्यांनी केलेल्या 'सहकार्याची' माहिती देणाऱ्या त्या शिक्षकाची अखेर बदली करण्यात आली आहे. मुलुंडमधल्या रावसाहेब बाळाराम ज्ञानदेव ठाकुर विद्यामंदिर संचालित वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयाच्या त्या शिक्षकांची त्याच विश्वस्त मंडळाच्या भांडुप येथील शाळेत  तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विद्याप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्याला तो केवळ विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांचा  मुलगा म्हणून बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका लिहिण्यात शिक्षक मदत करत होते. यासंदर्भातल्या टेलिफोन संभाषणाच्या 'ऑडिओ' पुराव्यासह 'मुंबई लाइव्ह'ने बातमी दिली होती. याच बातमीची दखल शाळा प्रशासनाला घ्यावी लागली आहे. 

या प्रकरणात गुंतलेल्या एका शिक्षकाची जरी बदली झाली असली तरीही पदाधिकाऱ्याच्या मुलाला गैरप्रकार करण्याचे कथित आदेश देणारे पदाधिकारी आणि ते अमलात आणणाऱ्या इतर शिक्षकांवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.  बदली झालेल्या शिक्षकाने पदाधिकाऱ्याच्या मुलाला गणिताची उत्तरपत्रिका लिहिण्यात मदत केल्याचे टेलिफोनिक संभाषणातून मान्य केले आहे.    



शिक्षिकेला मनस्ताप

या प्रकरणाशी संबंध नसलेल्या याच शाळेतील शिक्षिकेला मात्र सध्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या शिक्षिकेचा अपराध हाच की, त्यांनी परिक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेणाऱ्या तक्रारकर्ता राहुल बाणावली यांना साथ देत पोलिसांना याबाबतीतली अधिक माहिती दिली. सदर शिक्षिकेच्या वर्तनामुळे शाळेची बदनामी झाल्यााचा कांगावा शाळा प्रशासनाने केला आहे. परिणामी, या शिक्षिकेशी कुणीही संवादही साधू नये, असे फर्मानच मुख्याध्यापकांनी सोडले आहे, असा आरोप स्वतः सदर शिक्षिकेने केला आहे. आपल्याला मुख्याध्यापकांनी सर्वांसमक्ष अपमानित केल्याचाही आरोप त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे.  

मुख्याध्यापकांचा सावध पवित्रा

शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ चासकर यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'ने संपर्क साधला असता त्यांनी सावध पवित्रा घेतला. 


आमच्या शाळेतल्या कोणत्याही  शिक्षकावर बदलीची कारवाई झालेली नाही. आम्ही एका शिक्षकाला आमच्याच संस्थेच्या भांडुपमधल्या शाळेत काही काळापुरतं पाठवलं आहे. याचं कारण आमच्या शाळेत अतिरिक्त शिक्षक आहेत आणि भांडुपमधल्या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. मी आमच्या शाळेतल्या शिक्षिकेला सर्वांसमोर अपमानित केलं किंवा इतरांना त्यांच्याशी संवाद साधू नका, अशी तंबी दिली वगैरे बातम्यांमध्ये तथ्य नाही. 

जगन्नाथ चासकर, मुख्याध्यापक, वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय


आम्ही पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहेच. शाळेचे परिक्षेदरम्यानचे  सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, अशी आमची मागणी आजही कामय आहे. जे फुटेज डिलिट झाले आहे, ते पोलिसांनी रिकव्हर करावे. अशा प्रकारांमुळे शाळेचे नाव बदनाम होता कामा नये. गैरप्रकारांना आळा बसावा, असं मला या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मनापासून वाटतं. 

राहुल बाणावली, तक्रारकर्ता

'मुंबई लाइव्ह'ने दिलेल्या बातमीमुळे शाळा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मात्र अजूनही या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास सुरु झालेला नाही. याप्रकरणातले सत्य सर्वांसमोर येईपर्यंत बातमीचा पाठपुरावा 'मुंबई लाइव्ह' सुरुच ठेवणार आहे. 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा