इथे शिक्षकच झाले कॉपीबहाद्दर!

इथे शिक्षकच झाले कॉपीबहाद्दर!
इथे शिक्षकच झाले कॉपीबहाद्दर!
इथे शिक्षकच झाले कॉपीबहाद्दर!
See all
मुंबई  -  

मुलुंडमधल्या रावसाहेब बाळाराम ज्ञानदेव ठाकुर विद्यामंदिर संचालित विद्या प्रबोधिनी शाळेचा एक विद्यार्थी. अभ्यासात बेतास बेत असलेल्या या विद्यार्थ्याला मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत ६४ टक्के गुण मिळाले. ६४ टक्के मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यामुळे तो शिकत असलेली विद्या प्रबोधिनी शाळा चर्चेत येणार आहे. विद्यार्थ्याच्या निकालपत्रात फर्स्टक्लास दिसत असला, तरी त्याचं यश मात्र 'फर्स्ट क्लास' सदरात मोडणारं नाही. त्याला इतर विद्यार्थ्यांच्या साधारण तासभर आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती. ज्या विषयाची परीक्षा आहे, त्या विषयाचे शिक्षक त्याला उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिण्यात मदत करत होते. वेळेआधी प्रश्नपत्रिका, दिमतीला शिक्षकवर्ग आणि बसायला ऐसपैस स्वतंत्र वर्ग, असा या विद्यार्थ्याचा थाट होता. 'मुंबई लाइव्ह'च्या हाती आलेल्या ऑडिओ क्लिपमधून या प्रकाराचा उलगडा झाला आहे. दोन शिक्षकांमधल्या दूरध्वनी संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आहे. या विद्यार्थ्याने परिक्षेत मिळवलेला फर्स्टक्लास हा त्याच्या मेहनत आणि बुद्धिमत्तेचा नाही, तर परिक्षेत केलेल्या गैरप्रकाराचा परिपाक आहे, असं निदान सकृतदर्शनी मानायला वाव आहे.


विद्या प्रबोधिनी शाळेमध्ये शिकणारा हा विद्यार्थी त्याच शाळेच्या पदाधिकाऱ्याचा मुलगा. मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला प्रबोधिनी शाळा परीक्षा केंद्र म्हणून मिळालं होतं. नियोजित वेळेच्या साधारण तासभर आधी या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली जात असे. 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागलेल्या असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये दोन शिक्षकांमधला संवाद ऐकायला मिळतो. प्रश्नकर्ता शिक्षक ठाकुर शाळेच्या शिक्षकाकडे परिक्षेतल्या गैरप्रकाराच्या बातमीची शहानिशा करत आहेत. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरादाखल दिलेली माहिती थक्क करणारी आहे. राहुल बाणावली या रावसाहेब बाळाराम ज्ञानदेव ठाकुर विद्यामंदिर संचालित शाळेच्या माजी विद्यार्थ्याने ही ऑडिओ क्लिप मिळवली आहे.

सहयोगी ट्रस्टची असल्याने वामनराव मुरांजन माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना प्रबोधिनी शाळेत पर्यवेक्षक म्हणून पाठवलं जात होतं. पदाधिका-याच्या मुलाला उत्तरपत्रिका लिहायला मदत व्हावी, म्हणून हा प्रकार केला गेल्याचा राहुल बाणावली यांचा आरोप आहे.


वामनराव मुरांजन माध्यमिक शाळेत विद्या प्रबोधिनी शाळेतील शिक्षकांना सुपरव्हिजनसाठी पाठवले जात होते. पदाधिका-यांच्या मुलाला पेपर सोडवण्यात मदत व्हावी, म्हणून हा प्रकार केला गेला. मी पोलिसांकडे तक्रार करायला गेलो. तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं की, विद्यार्थ्याचं नाव बाहेर कळायला नको. आम्ही या प्रकरणाचा तपास करतो. पण त्यांनी माझ्या तक्रारीची माहिती शाळेच्या मॅनेजमेंटला दिली. आता शाळेने परीक्षेच्या काळातलं सीसीटीव्ही फुटेजसुद्धा डिलीट केलं आहे.

- राहुल बाणावली, तक्रारकर्ता


याप्रकरणी 'मुंबई लाइव्ह'ने शाळेशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवत हे प्रकरण अमान्य केलं.


असा कोणताही प्रकार शाळेत घडलेला नाही. अशी तक्रार करणाऱ्यावरच शाळा कारवाई करणार आहे. असा प्रकार शाळेत घडल्याचा कोणताही पुरावा नाही.

वामनराव मुरांजन माध्यमिक शाळेचे पदाधिकारी आणि कथित गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील


 


मला प्रबोधिनी शाळेत १० वीच्या परीक्षेसाठी सुपरव्हिजन लावण्यात आलं. त्यावेळी शाळेत आमच्या पदाधिका-यांच्या मुलाला पेपरच्या वेळेच्या एक तास आधी प्रश्नपत्रिका दिली जात असल्याचा प्रकार लक्षात आला. शाळेचे चेअरमन यांनी याबाबत असा कोणताही प्रकार शाळेत घडला नाही, अशा आशयाच्या पेपरवर शाळेतील शिक्षकांच्या सह्या घेतल्या. केवळ आपली नोकरी जाऊ नये म्हणून शाळेतील शिक्षकांनी त्या पेपरवर सह्या केल्या आहेत.


पर्यवेक्षक-शिक्षक, वामनराव मुरांजन माध्यमिक शाळा

दरम्यान, पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता 'आपण दोन वेळा सापळा रचूनही असा कोणताही प्रकार आढळून आला नाही' अशी माहिती मुलुंडच्या नवघर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माधव मोरे यांनी दिली. हेही वाचा

31 जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावा - राज्यपाल


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.