Advertisement

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पुन्हा अाश्वासन

विद्यार्थ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उपसलं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पुन्हा अाश्वासन
SHARES

मुंबई विद्यापीठाने रखडलेले सर्व निकाल जाहीर केल्याचा दावा केला असला, तरी हा दावा चुकीचा असल्याचा म्हणत विद्यार्थ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उपसलं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुस्त कारभाराचे वाभाडे काढले असले, तरी येत्या दोन दिवसांत पालक आणि विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असं गुळमुळीत अश्वासन पुन्हा एकदा विद्यापीठाने दिलं.   


काय आहे प्रकरण?

दिवाळी अगोदर विद्यापीठाने सर्व राखीव निकाल जाहीर केल्याचा दावा केला होता. मात्र 'लॉ'चा विद्यार्थी अमेय मालशेसह असंख्य विद्यार्थ्यांची हाती निकाल पडलाच नाही. अशा विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडे सोपवण्यात आली. तरीही आश्वासनानुसार निकाल जाहीर न झाल्यामुळे अमेयसह अनेक विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठात पुन्हा अंदोलन केलं.


६ दिवसांचं आश्वासन

या आधीही 'लॉ'चे निकाल लागावेत यासाठी अमेयने विद्यापीठात उपोषण केलं होते. त्यावेळी पुढील ६ दिवसांत निकाल जाहीर करण्याचं अश्वासन विद्यापीठाने दिलं होतं. त्यानंतर पुढील ६ दिवसांत घाईघाईने का होईना विद्यापीठाने निकाल जाहीर केले. तरीही अनेक विद्यार्थ्यांना आपले निकाल दिसलेच नाहीत.


मंगळवारी काय घडले?

विद्यापीठातील महात्मा फुले भवनसमोर मंगळवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली. निकाल मिळाल्याशिवाय विद्यापीठातून न हलण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला. केवळ निकाल नाही तर परीक्षेची वाढवलेली फी कमी करावी अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठापुढे ठेवल्या.



येत्या दोन दिवसांत पालक-विद्यार्थाी यांची विद्यापीठातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असं अश्वासन विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे रजिस्ट्रार दिनेश कांबळे यांनी दिेलं.  


'या' आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

  1. आजच्या आज सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे
  2. सरासरी गुण दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी 
  3. विद्यार्थ्यांच्या निकालात ज्या चुका आहेत, त्या तात्काळ दूर कराव्यात
  4. मेरीट लिस्ट कंपनीवर कारवाई करावी 


प्रभारी संचालक सुट्टीवर

विद्यार्थ्यांनी विद्यापीठात अंदोलन केलं खरं. पण त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला विद्यापीठाकडून जबाबदार व्यक्तीच उपस्थित नव्हता. विद्यापीठाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे १० दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उत्तर येण्यासाठी चांगलीच वाट बघावी लागली.


आम्ही आमच्या मागण्या विद्यापीठापुढे ठेवल्या आहेत. गेल्या वेळी मी उपोषणाला बसलो म्हणून त्याचदिवशी मला माझा निकाल मिळाला. पण आता मी इतर विद्यार्थ्यांच्या निकालासाठी लढत आहे. आता दोन दिवसांत आमची विद्यापीठातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत सगळे मुद्दे विद्यापीठापुढे मांडणार आहोत.

- अमेय मालशे, 'लाॅ'चा विद्यार्थी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा