Advertisement

विद्यापीठाकडून मतदार यादी जाहीर


विद्यापीठाकडून मतदार यादी जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठाने अधिसभा प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक आणि अभ्यास मंडळाचे काॅलेजातील विभाग प्रमुख यांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आक्षेपानंतर दुरुस्त केलेली तात्पुरती मतदार यादी जाहीर केली आहे. या तातुपरत्या यादीत आक्षेप असल्यास त्याविरोधात कुलगुरूंकडे अप‌ील करण्याची संधी विद्यापीठाने दिली आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह हे अपील मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट विभागातील निवडणूक विभागात करता येणार आहे. यासाठी १३ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.


यादी संकेतस्थळावर

या निवडणुकीची अधिसूचना विद्यापीठाने २ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करत तात्पुरती मतदार यादी जाहीर केली होती. यानंतर मतदार यादीस कोणाचे काही आक्षेप असल्यास ते लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याची अंतिम तारीख ६ डिसेंबर २०१७ पर्यंत होती. चार घटकाच्या मतदार यादीस विद्यापीठाकडे अनेक आक्षेप प्राप्त झाले. तसेच काही त्रुटी विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आल्या. त्‍यामुळे या त्रुटी व आक्षेपाची छाननी करून तात्पुरत्या स्वरूपातील मतदार यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहे.




दोन टप्पे

अधिसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक व अभ्यास मंडळासाठी काॅलेजातील विभाग प्रमुख, अशा चार घटकांच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात शिक्षक व नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अधिसभेवर जाण्यासाठी १९ जागा व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी ३ अशा एकूण २२ जागा असतील.


मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील आक्षेपांची नियमानुसार छाननी करून सुधारित तात्पुरती मतदार यादी जाहीर केली आहे. यावर काही आक्षेप असतील तर ते अपील स्वरूपात कुलगुरूंकडे निर्धारित वेळेत सादर करावेत. या निवडणुकीसाठी सर्व घटकांनी सहकार्य करावं ही विनंती.

- डॉ. दिनेश कांबळे, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा