Advertisement

विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोर 'टाळे लावा' आंदोलन


विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोर 'टाळे लावा' आंदोलन
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभार गेल्या कित्येक वर्षांपासून चव्हाट्यावर येत आहे. या कारणामुळे परीक्षा विभाग चालवता येत नसेल तर टाळं लावा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला आठवडाभरापूर्वी सुनावलं होतं. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेने परीक्षा विभागाबाहेर टाळं लावा आंदोलन केलं.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली हे ‘टाळे लावा’ आंदोलन करण्यात आलं असून यावेळी विद्यापीठाकडून परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुले यांनी निवेदन स्वीकारलं.


विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला

मुंबई विद्यापीठात परीक्षा वेळापत्रक आणि निकाल गोंधळ सुरू असताना आता विद्यापीठात पुर्नमूल्यांकन गोंधळ सुरू झाला आहे. गेल्यावर्षी विद्यापीठातील ९७ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केलं होतं. त्यापैकी ३५ हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. गेल्या वर्षाचा निकाल लागल्यानंतर जवळपास ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. हा आकडा विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आकडा असून यावरून विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरून विश्वास कमी झाल्याचं दर्शवत आहे.


विद्यापीठाचा अनागोंदी कारभार

काही दिवसंपूर्वी रिद्धी परब या टी. वाय. बीकॉममध्ये शिकणाऱ्या मुलीला पास असूनही नापास शेरा देण्यात आला होता. नापास झाल्यानं खचलेल्या रिद्धीनं आत्महत्या करून जीवन संपवलं होतं. परंतु पुनर्मूल्यांकनात ती उत्तीर्ण असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये रिद्धीच्या पालकांची भेट घेत परब कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचं कोरड सांत्वन केलं होतं.
विद्यापीठ प्रशासनाची चूक असूनही रिद्धीच्या पालकांना आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत प्राप्त झाली नाही. त्यामुळे विद्यापीठानं लवकरात लवकर परब कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी विनंतीही राष्ट्रवादीनं केली.


'कायदेशीर कारवाई करा'

पदवीचे निकाल जाहीर होऊन अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका प्राप्त झाल्या नसून चुकीच्या पद्धतीन मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली.

गरवारे इन्स्टिट्युटच्या माध्यमातून ५३ व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यापैकी मास्टर ऑफ सबस्टॅनशिल डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवार, ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा संपल्यानंतर नियंत्रक कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सीलबंद करून नियंत्रक कार्यालयातील कपाटात ठेवल्या होत्या.


अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मात्र सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेलं हे कपाट उघडं असल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केली असल्याचं उघडकीस आलं होत. दरम्यान या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरून विश्वास उडाला आहे, म्हणून मुंबई विद्यापीठ परीक्षा भवनाची न्यायालयीन चौकशी करावी अन्यथा विद्यार्थांच्या मनामध्ये संशय निर्माण होऊन सबंधित विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होईल. त्याशिवाय परीक्षा भवन चालवता येत नसेल तर बरखास्त करून टाका अन्यथा पुढील काळात हिंसक आंदोलन करण्यात येईल.
- अॅड. अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा