SHARE

माध्यमिक शाळांसोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्कवाढीचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच गाजत आहे. त्यात नव्या महाविद्यालयाची भर पडली असून रत्नागिरीतील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात अनिवार्य शुल्कवाढ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ही शुल्कवाढ रद्द न केल्यास 20 जून रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचाचे संघटक डॉ. विवेक कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली पालक हे आंदोलन करणार आहेत.

गेल्या वर्षी वालावलकर महाविद्यालयाने पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 4 लाख 9 हजार इतके शुल्क घेतले होते. मात्र यंदा या शुल्कात महाविद्यालयाने 80 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क 7 लाख 25 हजार रुपयांवर गेले आहे.

एवढे अवास्तव शुल्क आकारल्यामुळे पालकांनी हे वाढलेले शुल्क भरण्यास विरोध केला आहे. प्रशासनाने म्हणणे न ऐकल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे. या आधी पालकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतरही या महाविद्यालयावर कारवाई न झाल्याने मंगळवार 20 जून रोजी पालक आंदोलन करणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या