Advertisement

विद्यार्थ्याकडे कॉपी आढळल्यास सबंधित शाळांची मान्यता होणार रद्द

दहावी आणि बारावीची परीक्षा सध्या सुरू असून, अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस येत आहेत.

विद्यार्थ्याकडे कॉपी आढळल्यास सबंधित शाळांची मान्यता होणार रद्द
SHARES

दरवर्षी दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी कॉपी करताना आढळून येतात. त्यावेळी संबंधित शाळेकडून कारवाई केली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना अशाप्रकरणात समजही दिली जाते. परंतू, आता बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक किंवा इतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्याचं दिसून आल्यास किंवा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास अशा शाळांची मान्यताच रद्द केली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

दहावी आणि बारावीची परीक्षा सध्या सुरू असून, अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार उघडकीस येत आहेत. तसेच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचेही दिसून आले होते. हा मुद्दा काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी सभागृहात उपस्थित केला. त्याला उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी परीक्षेत कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अशा अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे तसेच संबंधित शाळेला बोर्डाचे परीक्षा केंद्र म्हणून असलेली मान्यता कायमची रद्द करण्यात येईल, असे सांगितले.

यंदा दहावीच्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान पैठण तालुक्यातील नीलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कॉपी प्रकरणाच्या केलेल्या प्राथमिक चौकशीत शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा