Advertisement

विद्यापीठाच्या उत्पन्नासाठी पुनर्मूल्यांकन एक स्रोत


विद्यापीठाच्या उत्पन्नासाठी पुनर्मूल्यांकन एक स्रोत
SHARES

विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाच्या अर्जाद्वारे सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वे समोर आली आहे. त्याशिवाय छायांकित प्रती देण्यासाठी विद्यापीठाने सुमारे ४५ लाख रुपयांचं शुल्क वसूल केल्याचंही स्पष्ट झालं आहे. यामुळे पुनर्मूल्यांकन हा विद्यापीठाच्या उत्पन्नाचा एक स्रोतच मानला जात आहे.


'या' सुविधांसाठी शुल्काची आकारणी

विद्यापीठाद्वारे विविध परीक्षांच आयोजन करण्यात येतं. या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यर्थ्यांना मनासारखे गुण मिळाले नाहीत, तर त्यांच्यासाठी पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा मुंबई विद्यापीठात उपलब्ध आहे. त्याशिवाय विद्यापीठ विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रतही देण्यात येते. मात्र या दोन्ही सुविधांसाठी विद्यापीठाकडून काही ठराविक शुल्काची आकारणी करण्यात येते.


'या' कालावधीत 'इतकी' कमाई

गेल्या तीन चार वर्षांपासून पुनर्मूल्यांकन व उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींना अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं समोर येत आहे. यातून पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काद्वारे विद्यापीठानं २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १२ कोटी ९ लाख ४१० रुपयांची कमाई केली असून छायांकित प्रतींद्वारे ४४ लाख १६ हजार ४५० रुपयांची कमाई केली आहे. ही माहिती विहार दुर्वे यांना माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे.


तीन वर्षांत कोणतीही कारवाई नाही

नापास झालेले सुमारे ३५ हजार विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात पास झाल्याची धक्कादायक माहिती काही दिवांसापूर्वी समोर आली होती. यानुसार मूल्यांकन करताना प्राध्यापकांकडून चुका झाल्यानं विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागतो. अशा चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर कोणती कारवाई केली? याबाबत दुर्वे यांनी विचारणा केली असता त्यांना गेल्या तीन वर्षांत अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचं उत्तर विद्यापीठाच्या माहिती अधिकारातून मिळालं आहे.


मग यांना शिक्षा का नाही?

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा अधिनियम ४८(५)(ए) आणि (बी) नुसार विद्यापीठ अशा प्राध्यापकांवर कारवाई करू शकते, असंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना चूक केली तर त्यांना शिक्षा, मात्र मूल्यांकन करताना प्राध्यापकांनी चूक केली तर त्यांना शिक्षा का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.


विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शुल्क

वर्षपुनर्मूल्यांकन रक्कमछायांकित प्रत रक्कम
२०१५ -१६
५ कोटी २८ लाख ७८ हजार ९४० 
 २० लाख ९३ हजार ८२५
२०१६-१७
४ कोटी, ८३ लाख, ३० हजार, ४९० 
१५ लाख ३२ हजार ०५५
डिसें. २०१७पर्यंत
१ कोटी ९७ लाख १० हजार ९८०
७ लाख ९० हजार ५७०


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा