शालेय सहली जाणार पुस्तकांच्या गावी!

 Mumbai
शालेय सहली जाणार पुस्तकांच्या गावी!
Mumbai  -  

मोबाइल इंटरनेट, गेम्स, व्हिडिओत रममाण झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची आणि पर्यायाने वाचनाची ओढ लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने यंदा शालेय सहली 'देशातील पहिलेवहिले पुस्तकाचे गाव', अशी ओळख बनलेल्या भिलार गावात नेण्यात येणार आहेत. या सहलीसाठी मुख्याध्यापक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

शालेय सहली केवळ ऐतिहासिक, ज्ञान मिळेल अशा ठिकाणीच न्याव्यात, असा शासकीय अध्यादेश काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने काढला होता. त्यामुळेच मुख्याध्यापक संघटनांनी भिलारी गावात सहली घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ताणातून मुक्तता मिळावी, यासाठी शाळा आपल्या सहलींसाठी नेहमीच रिसॉर्ट, वॉटरपार्क, संग्रहालय अशा ठिकाणांची निवड करतात. परंतु अशा सहलीतून मजा-मस्ती सोडल्यास विद्यार्थ्यांना काहीच शिकायला मिळत नाही. त्यामुळे शाळांनी यापुढे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाची ओळख व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, अशाच स्थळांची निवड सहलीसाठी करावी, या उद्देशाने शासकीय अध्यादेश काढला आहे.

या अध्यादेशाकडे पाहता यंदा शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कुठे काढल्या जातील, याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यावर मुख्याध्यापक संघटनांनी अत्यंत विचारपूर्वक भिलार या गावाची निवड केली आहे.

थंड हवेच्या ठिकाणी वसलेले महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध होते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने या गावाने आपली 'पुस्तकाचे गाव' ही नवी ओळख प्रस्थापित केली आहे. या गावातील प्रत्येक घरात कथा, कादंबरी, ललित लेखन, विज्ञान, वैचारिक अशी अनेक विषयांवरील पुस्तके कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहतात. प्रत्येक घरांत वाचकांना राहण्याची, वाचनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. भिलार गावाला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल, या अपेक्षेनेच शालेय सहली भिलारमध्ये नेण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षण परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले.

Loading Comments