Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के मिळवण्याचा मार्ग बनला कठीण

आता कला आणि क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले जाणार नाहीत. तर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर हे गुण देण्यात येतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के मिळवण्याचा मार्ग बनला कठीण
SHARES

दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे १०० टक्के गुण मिळाल्याचं कानावर येतं आणि अनेकांचे डोळे विस्फारतात. त्यानंतर 'आमच्या काळी नव्हते हो एवढे टक्के मिळत' असा टिपिकल डायलॉगही वडिलधाऱ्यांकडून ऐकायला मिळतो. विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळण्यामागचं मूळ कारणं म्हणजे शाळेकडून दिले जाणारे अतिरीक्त गुण. मात्र आता या वर्षापासून शाळेकडून दिल्या जाणाऱ्या या अतिरीक्त गुणांची खैरात थांबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.


कला, क्रीडा स्पर्धेत सरसकट गुण नाही

आता कला आणि क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले जाणार नाहीत. तर विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर हे गुण देण्यात येतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागातर्फे कला, क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अतिरीक्त गुण दिले जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळू लागले. मात्र या गुणांचा उपयोग टक्केवारी वाढवण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या अतिरीक्त गुणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.


असा आहे बदल

  1. केवळ शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वादन, आणि शास्त्रीय गायनात ३ किंवा ५ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच अतिरीक्त गुण देण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या संस्थेतून परीक्षा दिली आहे. त्या संस्थेची नोंदणी सांस्कृतीक विभागाकडे असणं आवश्यक आहे.
  2. पाश्चात्य नृत्याकरीता विद्यार्थ्यांना अतिरीक्त गुण दिले जाणार नाहीत.
  3. चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावर अभिनय पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्याला १० अतिरीक्त गुण देण्यात यावेत. त्याचबरोबर चित्रपटासाठी राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याला ५ अतिरीक्त गुण देण्यात यावेत.
  4. लोककलेसाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाच्या संख्येनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार २५ ते एकूण ५० प्रयोग केलेल्या विद्यार्थ्याला ५ गुण, ५० पेक्षा जास्त प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्याला १० गुण दिले जाणार आहेत.
  5. इंटरमिजीएट ड्रॉईंग परिक्षेत 'ए' ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांना ७ गुण, 'बी' ग्रेड प्राप्त विद्यार्थ्यांना ५ गुण आणि 'सी' ग्रेड प्रप्त विद्यार्थ्यांना ३ गुण गेण्यात यावेत.
  6. १७ नंबरचा फाॅर्म भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरीक्त गुण मिळणार नाहीत.


हा तर सकारात्मक निर्णय

या निर्णयामुळे विद्यार्थी १० वीची परीक्षा गंभीरपणे घेतील. यामुळे अतिरीक्त गुणांची खैरात बंद होईल. हा निर्णय सकारात्मकच आहे. विद्यार्थ्यांना मेहनत करून मिळवलेल्या यशाचं महत्त्व समजेेल.

- विनया लिमये,  निवृत्त शिक्षीका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा