रात्रशाळेतील 1010 शिक्षकांना काढण्याचा सरकारचा घाट

 Mumbai
रात्रशाळेतील 1010 शिक्षकांना काढण्याचा सरकारचा घाट

राज्यात मुक्तशाळा सुरू करता याव्यात यासाठी राज्य सरकारने 17 मे ला घेतलेल्या निर्णयानुसार रात्र शाळेतील 1010 शिक्षकांना काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रात्र शाळांना हळूहळू बंद करण्याचे धोरण सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी 'महाराष्ट्रात रात्रशाळांची 150 वर्षांची परंपरा आहे. हजारो गरीब कुटुंबातील शिक्षणासाठी रात्र शाळेचा मोठा आधार होता. आम्हीही रात्रशाळेत शिकून मोठे झालो आहोत. त्यामुळे रात्रशाळा बंद करू नका,' असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले.

यासंदर्भात जनता दल सेक्युलरचे आमदार कपिल पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले की, महाराष्ट्रात एकूण 176 रात्रशाळा असून त्यातील 150 रात्रशाळा व ज्युनिअर कॉलेज एकट्या मुंबईत आहेत. राज्य सरकारला रात्र शाळेवर होणारा खर्च कमी करायचा आहे आणि मुक्तशाळा सुरु करायच्या आहेत. त्यासाठीच रात्र शाळेतील 1010 शिक्षकांना काढून टाकण्याचा घाट घातला आहे. दिवसा काम करुन रात्री शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी रात्र शाळेबाबतच्या निर्णयासाठी दोन दिवसांचा अवधी मागितलेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला राज्यात मुक्तशाळा सुरु करायच्या आहेत. त्यामुळे मुंबईसहित राज्यातील सर्व रात्रशाळा हळूहळू बंद करायच्या आहेत. रात्रशाळांवर वर्षाला 34 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च केला जातो. हा खर्च वाचविण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना मुक्त शाळांमध्ये शिकायचे आहे, त्यांना इयत्तेनुसार पुस्तके दिली जातील. शाळेत जाण्याची गरज या विद्यार्थ्यांना पडणार नाही. फक्त परिक्षा देण्यासाठी त्यांना शाळेत जावे लागेल.

Loading Comments