Advertisement

MPSC: परीक्षा पुढं ढकलल्याने विद्यार्थी प्रचंड नाराज, पुण्यात रास्तारोको

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस आधी पुढं ढकलण्यात आल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.

MPSC: परीक्षा पुढं ढकलल्याने विद्यार्थी प्रचंड नाराज, पुण्यात रास्तारोको
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस आधी पुढं ढकलण्यात आल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. ही परीक्षा रविवार १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती.

राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ही परीक्षा दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

परीक्षा पुढं ढकलण्यात आल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आली. एमपीएससीच्या परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून पोहोचले होते. मात्र, ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.

हेही वाचा- राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

एवढंच नाही, तर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यातील रस्त्यावर उतरले. नवी पेठेमध्ये रस्त्यावर उतरून काही विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला. तर, अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरही विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला. मात्र स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करत त्वरीत एका बाजूची वाहतूक सुरू केली. जागोजागी जमलेले विद्यार्थी एमपीएससीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

याबाबतचं प्रसिद्धीपत्रक राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. प्रसिद्धीपत्रक म्हटलं आहे की,  आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.  परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीख जारी केली जाईल, असंही यामध्ये म्हटलं आहे.

(student protest in pune against MPSC pre exam postponed by commission)

हेही वाचा- ‘आनंदवन’लाही कोरोनाची बाधा, प्रतिबंधित क्षेत्र घोषित!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा