Advertisement

परीक्षा काळातच शिक्षकांना प्रशिक्षण? परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता


परीक्षा काळातच शिक्षकांना प्रशिक्षण? परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता
SHARES

एका बाजूला १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे १० वीच्या तोंडी, प्रॅक्टिकल व श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचं नियोजन शाळांमध्ये सुरू आहे. त्यातच प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने मुंबईतील शिक्षकांसाठी २३ व २४ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण
शिबिराचं आयोजन केलं आहे. शिक्षक या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहिल्यास परीक्षांवर परिणाम होणार असल्याने हे प्रशिक्षण शिबीर तातडीने स्थगित करावं, अशी मागणी शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे.


शिक्षकांसाठी चर्चासत्र

परीक्षा काळातच विद्या प्राधिकरणाकडून इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचं हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील शिक्षण निरीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खाजगी अनुदानित व मुंबई महापालिकेतील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना या चर्चासत्राला उपस्थित राहण्याबाबत आदेश राज्य सरकारने दिले आहेत.


शिक्षक परीक्षांमध्ये व्यस्त

बुधवारपासून १२ वीची परीक्षा सुरू झाल्याने अनेक शाळांमध्ये या परीक्षेचं पर्यवेक्षण शिक्षकांना करावं लागत आहे. यासोबतच १० वी भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा, आयसीटी व विज्ञान विषयांचं प्रॅक्टिकल, श्रेणी विषयांचं अंतर्गत मूल्यमापन तसेच नियोजन यामध्येही शाळांमधील शिक्षक व्यस्थ आहेत.

शिक्षकांना या प्रशिक्षणाला पाठवलं तर परीक्षांच्या कामावर त्याचा परिणाम होणार अाहे. त्यामुळे प्रादेशिक विद्यप्राधिकारणाने तातडीने हे चर्चासत्र स्थगित करून १० वी व १२ वीच्या परीक्षानंतर ते घेण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबईच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाला पत्र देखील लिहिलं आहे.


शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी हे चर्चासत्र गरजेचं असलं तरी शाळांमधील सध्याचा परीक्षांचा काळही तितकाच महत्वाचा आहे. आमचा कोणत्याही प्रशिक्षणाला अथवा चर्चासत्राला विरोध नसून त्याच्या अधिक परिणामकारकतेसाठी हे चर्चासत्र परीक्षांनंतर घेण्याची आवश्यकता आहे.
- अनिल बोरनारे , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा