मुंंबई बँकेत खाते नाही,... म्हणून पगार उशिरा


SHARE

एकीकडे शिक्षकांना महिन्याच्या 1 तारखेलाच पगार देण्याचे आदेश असताना शिक्षकांना मात्र दोन-दोन महिने पगार मिळत नाही. अनेक शिक्षकांना ऑगस्ट-सप्टेंबरचे पगारच मिळालेला नाही. आपल्या हक्काच्या पगारासाठी शिक्षकांना शाळेच्या वेळा सांभाळून सध्या शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवायला लागत आहेत.

गोवंडीच्या राधाबाई सोभराज टहीलियाली या शाळेतील काही शिक्षकांचे मुंबई बॅँकेत खाते आहे. तर काही शिक्षकांचे खाते युनियन बॅँकेत आहे. ज्या शिक्षकांचे मुंबई बॅँकेत खाते आहे, अशा शिक्षकांचा पगार महिन्याच्या एक तारखेला बॅँकेत जमा होतो. मात्र ज्या शिक्षकांच्या पागाराचे खाते मुंबई बॅँकेत नाही, अशा शिक्षकांना आपल्या हक्काच्या पगारासाठी शिक्षण विभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.


काय आहे प्रकरण?

3 जून रोजी शिक्षण विभागाने राज्यातील 27 हजार शित्रकांचे पगार मुंबई जिल्हा बॅँकेतून देण्याचा निर्णय जाहीर केला. शासनाने मुंबईतील सर्व शिक्षकांच्या पगाराची रक्कम शासनाकडून मुंबई बॅँकेतच जमा करण्यात येईल. त्यामुळे सर्व शिक्षकांना मुंबई बॅँकेत खाते उघडण्याचे आदेश दिले. मात्र शिक्षकांनी शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला. या विरोधात अनेक वेळा आंदोलनेही झाली. शासनाच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांनी न्यायालयाची पायरीही चढली.

मुंबई बँकही भ्रष्टाचारी आहे. या बॅँकेने अनेक शिक्षकांच्या ठेवी गोठवल्या होत्या. याच बॅँकेकडे पुन्हा पगार सोपवल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी होती. आम्ही शिक्षकांच्या पगाराचे सर्व स्टेटमेंट्स शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. शिक्षकांचे पगार का होत नाही? याचे उत्तर आमच्याकडे नाही, असे म्हणत गोवंडीच्या राधाबाई सोभराज टहीलियाली विद्यालय शाळा प्रशासने हात वर केले आहेत. त्यामुळे आता न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.

दरमहिन्याला आमच्या पगारासाठी भांडावे लागते. मुंबई बँकेत ज्या शिक्षकांचे खाते, त्यांना पगार दरमहिन्याला वेळच्या वेळी दिला जातो. मात्र काही शिक्षकांची खाती मुंबई बँकेत नाही, अशा शिक्षकांना दोन-दोन महिने पगार मिळत नाही. आमचा जूलैचा पगारही दोन महिने उशिराने झाला. शाळेने आमचे पगाराचे सर्व कागदपत्र प्रत्येक महिन्याला शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत. मात्र पगार कुठे अडला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आम्हाला दिले जात नाही.
- शिवाजी कुलाळ, शिक्षक, राधाबाई सोभराज टहीलियाली विद्यालय


हेही वाचा - 

शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतच का?


संबंधित विषय