Advertisement

म्हणून ठरलं मिठीबाई अव्वल...

मुंबईत कॉलेजांची संख्या कमी नाही. मात्र अभ्यास, खेळ, मनोरंजन, कल्चरल अॅक्टिव्हीज असे सर्व धडे एकत्रितरित्या मिळतील असे काॅलेज हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच..! त्यात मिठीबाईचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कारण या काॅलेजला नुकताच मुंबई विद्यापीठाचा शहरी भागातील सर्वोत्तम काॅलेजचा पुरस्कार मिळाला आहे.

म्हणून ठरलं मिठीबाई अव्वल...
SHARES

आजची तरुणाई म्हणजे उद्याचं भविष्य. शालेय जीवनाचा प्रवास पूर्ण करून जेव्हा ही तरुणाई महाविद्यालयीन प्रवासाला सुरूवात करते, तेव्हा भविष्याच्या आडवळणावर खरी वाटचाल सुरू होते. त्यातला पहिला टप्पा म्हणजे योग्य काॅलेजची निवड. दहावीचे रिझल्ट लागल्यावर टक्केवारीनुसार कुठल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यावं. कुठलं काॅलेज आपल्यातील सुप्त गुणांना चालना देईल, व्यक्तीमत्त्व, करिअर घडवेल याचा विचार विद्यार्थी आणि त्यांचे पालक आवर्जून करतात. त्यात फिट बसणारं नाव म्हणजे विलेपार्लेतील मिठीबाई काॅलेज. मुंबईत कॉलेजांची संख्या कमी नाही. मात्र अभ्यास, खेळ, मनोरंजन, कल्चरल अॅक्टिव्हीज असे सर्व धडे एकत्रितरित्या मिळतील असे काॅलेज हाताच्या बोटांवर मोजण्या इतकीच..! त्यात मिठीबाईचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कारण या काॅलेजला नुकताच मुंबई विद्यापीठाचा शहरी भागातील सर्वोत्तम काॅलेजचा पुरस्कार मिळाला आहे.


कसा मिळाला पुरस्कार?

या पुरस्काराच्या निवडीसाठी माजी कुलगुरू आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ विविध कॉलेजांना भेटी देऊन तिथलं वातावरण, सोईसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा तपासून सर्वंकष मूल्यमापन करतात. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा, शैक्षणिक सुविधा, कॉलेज स्टाफ या साऱ्यांचं परीक्षण केलं जातं. त्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वोत्तम काॅलेजांची निवड केली जाते.

यंदाच्या शहरी भागातील उत्कृष्ट काॅलेजच्या श्रेणीत मिठीबाईची निवड झाली आहे. विद्यापीठाच्या यादीत सगळ्यात टॉपला येण्याचा मान मिठीबाई कॉलेजला कसा मिळाला आणि काॅलेजचं वेगळपण काय? याबद्दल कॉलेजचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी दिलेली ही माहिती.




तंत्रज्ञानाचा वापर

मिठीबाई काॅलेज हे ५७ वर्षे जुनं आणि नामांकित असं कॉलेज असून विलेपार्ले केळवाणी मंडळाच्या संपूर्ण मार्गदर्शन व सहकार्यावर हे काॅलेज विविध कलागुणांमध्ये प्राविण्य मिळवत आहे. काॅलेजातील शिक्षक अनुभवी असून शैक्षणिक कार्यात पारंगत आहेत. तसंच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांच्या मेहनतीचं फळ असल्याचं त्यांनी सांगितलं. काॅलेज प्रशासनाच्या कामकाजात प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यात अद्यावत सॅप सिस्टिम, ब्लॅकबोर्ड टेक्नॉलॉजी अॅप आणि इतर तंत्रज्ञानाचा समावेश आहे.


NAAC चं मानांकन

अलिकडेच काॅलेजला NAAC चं ‘A’ grade, ३.५७ CGPA हे मानांकन प्राप्त झालं आहे. त्याचप्रमाणे काॅलेजला ८० लाख रुपये DST व ६९ लाख रुपये DST असं अनुदान भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीकडून मिळालं आहे.

मिठीबाई काॅलेजमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखा आहेत. त्यामध्ये एकूण १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ६ हजार विद्यार्थी कनिष्ठ तर ६ हजार वरिष्ठ काॅलेजातील आहेत. काॅलेजमध्ये ३० शैक्षणिक विभाग आहेत. त्यामध्ये १५ पदव्युत्तर विभाग असून ९ पीएच डी सेंटर (इंग्रजी, वाणिज्य, प्राणिशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौक्तिकशास्त्र, गणित, बियोटेकनॉलॉजी) आहेत. काॅलेजमध्ये एकूण ४५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती प्राध्यापक अंजली पाटकर यांनी दिली.


फेस्टिव्हल्स, सामाजिक उपक्रमांत आघाडीवर

काॅलेजने शैक्षणिक, सहशैक्षणिक व इतर उपक्रमामध्ये सातत्याने केलेली उत्कृष्ट कामगिरी, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलं आहे. काॅलेजचा ‘क्षितिज’ हा आंतरराष्ट्रीय कला व सांस्कृतिक नामांकित फेस्टिव्हल आहे. दरवर्षी जवळपास ४५ हजार विद्यार्थी या फेस्टिव्हलमध्ये भाग घेत असतात. तसंच काॅलेजला IPTA अॅवॉर्ड गेल्या १० वर्षांमध्ये ७ वेळा मिळाला आहे.



युवा महोत्सवात अव्वल स्थान

काॅलेजला ४८ व्या युवा महोत्सवात अव्वल स्थान मिळालं होतं. तर ४९ व्या युवा महोत्सवात झोनल चॅम्पियनशीप मिळाल्याची माहिती सागर राणा या विद्यार्थ्याने दिली. काॅलेजने अध्यापन व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये मानसशास्त्र, संख्याशास्त्र व वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये सलग सुवर्णपदके मिळवलेली आहेत.


जॉय ऑफ गिव्हिंग

त्याचप्रमाणे, NCC, NSS, DLLE व इन्स्टिट्यूशनल सोशल सिस्पॉन्सिबिलिटी- जॉय ऑफ गिव्हिंग या माध्यमांतून सामाजिक कार्यात काॅलेजचा मोलाचा सहभाग आहे. काॅलेजची इमारत संपूर्ण वातानुकूलित असून त्यामध्ये वर्ग व अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. तसेच ग्रंथालय अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. काॅलेजचं प्रवेशद्वार हे RFID युक्त आहे. ज्याद्वारे केवळ विद्यार्थ्यांनाच आत प्रवेश दिला जात असल्याची माहिती राजपाल हांडे यांनी दिली.


स्वायत्ततेसाठी प्रयत्न

काॅलेजची शैक्षणिक प्रगती लक्षात घेता काॅलेजला स्वायत्तता मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी अंतिम टप्प्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीची प्रत्यक्ष भेट काॅलेजला अपेक्षित आहे. जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षांत काॅलेज स्वायत्त झालेलं असेल, अशी माहिती प्राचार्यानी दिली आहे. तंत्रज्ञानापासून उपक्रमांपर्यंत सगळ्यात आघाडीवर असल्याने आपल्याच मिठीबाई खऱ्या अर्थाने शहरातील उत्कृष्ट कॉलेज ठरलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा