Advertisement

दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे २० गुण द्या, युवासेनेची मागणी

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मिळणारे भाषाविषयक अंतर्गत गुण तात्काळ रद्द करावेत अशी सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य मंडळाला केली होती. गेल्या वर्षीपासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू करण्यात आला आहे. तर या वर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू करण्यात येईल, अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी केली होती.

दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे २० गुण द्या, युवासेनेची मागणी
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भाषा विषया अंतर्गत तोंडी परीक्षेचे २० गुण रद्द करुन १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय मार्च २०१९ पासून घेतला आहे. या उलट इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना शाळेअंतर्गत ४० गुण दिले जातात. ही तफावत टाळण्यासाठी एसएससीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे अंतर्गत (इंटर्नल) २० गुण देण्यात यावेत, अशी मागणी युवासेनेने केली आहे.


शासन निर्णय काय?

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मिळणारे भाषाविषयक अंतर्गत गुण तात्काळ रद्द करावेत अशी सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्य मंडळाला केली होती. गेल्या वर्षीपासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू करण्यात आला आहे. तर या वर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू करण्यात येईल, अशी सूचना शिक्षणमंत्र्यांनी केली होती.


सरसकट १०० गुण

त्यानुसार यंदा शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांचे अंतर्गत मिळणारे २० गुण रद्द करण्यात येणार असून सरसकट १०० गुणांची लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. याआधी विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र या भाषा विषयाची ८० गुणांची लेखी परीक्षा व २० मार्काची तोंडी परीक्षा घेण्यात येत होती. परंतु यंदाच्या वर्षीपासून शाळांमार्फत देण्यात येणार २० गुण रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरणार आहे.


इतर बोर्डांना ४० गुण

विशेष म्हणजे राज्य मंडळाव्यतिरिक्त सीबीएससी बोर्ड, आयसीसी बोर्ड, आयबी बोर्ड या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना १०० गुणांपैकी अंतर्गत ४० गुण दिले जातात. सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई या केंद्रीय मंडळांच्या दहावीचे गुण देण्याच्या पद्धतीत फरक असल्यामुळे त्यांच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.


विद्यार्थ्यांना फटका

मुंबईतील बहुतांश विद्यार्थी राज्य मंडळाच्या अनुदानित शाळा, कॉलेजात शिक्षण घेत आहेत. मात्र मंडळाच्या या निर्णयाचा फटका एसएससी बोर्डात शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना बसणार असून त्यांना चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळणार नाहीत. त्यामुळं सीबीएसई व इतर बोर्डातंर्गत गुणांची खिरापत बंद करून राज्य मंडळातंर्गत मिळणारे अतंर्गत गुण पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी युवासेनेच्या वतीनं करण्यात येत आहे.


शिक्षणमंत्र्यांची भेट

याबाबत युवासेनेच्या शिष्टमंडळानं मंगळवारी विधानभवनामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं असून हा निर्णय रद्द करुन एसएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. या निर्णयाबाबत फेरविचार करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असून त्यात युवासेनेच्या सदस्यही असतील. या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय देण्यात येईल, असं आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे.



हेही वाचा-

प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड

मुंबईतल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार सवलती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा