Advertisement

महापौरपद निवडणुकीच्या तारखेवरून राडेबाजी


महापौरपद निवडणुकीच्या तारखेवरून राडेबाजी
SHARES

मुंबई - मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या तारखेवरून आता घोळ सुरू झाला आहे. प्रत्यक्षात 9 मार्चला होणारी ही निवडणूक 8 तारखेलाच घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 8 तारखेला निवडणूक घेतल्यास मतदान कुणी करायचे हाच कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे 8 तारखेला निवडणूक झाल्यास विद्यमान नगरसेवकही यात भाग घेणार असल्यामुळे या निवडणुकीत राडेबाजी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महपालिकेचे दावे शिवसेना आणि भाजपाकडून केले जात आहे. आता महापौर कुणाचा बसतो हे येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होईल. परंतु आता महापौरपदाची निवडणूक कधी घ्यावी यावरून महापालिका प्रशासन, भाजपा आणि शिवसेना यांच्यातच खलबते सुरू झाली आहे. मुंबईतील विद्यमान नगरसेवकांची मुदत 8 मार्चपर्यंत आहे. त्यामुळे 9 मार्चला महापौर पदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम प्रशासनाने निश्चित केला होता. परंतु आता महापालिका आयुक्तांच्या सुचनेनुसार ही निवडणूक 8 मार्चला घेण्याचे निश्चित केले असून त्याप्रमाणेच कार्यक्रमही जाहीर केला आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक झाल्यास नवनिर्वाचित महापालिका सदस्यांसह विद्यमान सदस्यही यात सहभागी होऊ शकतात. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानेच महापौरपदाची निवडणूक 8 मार्चला घेण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चिटणीस विभागाला ही निवडणूक 8 मार्च घेण्याचे कळवले आहे. त्याप्रमाणे चिटणीस विभागाने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी 8 मार्चची तारीख निश्चित करून कार्यक्रम ठरवण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका नियमानुसार सदस्यांची मुदत ही 8 मार्चपर्यंत आहे. रात्री बारावाजेपर्यंत विद्यमान नगरसेवक हे महापालिकेचे तांत्रिक सदस्य आहेत. त्यामुळे जर 9 ऐवजी 8 तारखेला महापौरपदाची निवडणूक घेतल्यास शिवसेनेचे सर्व विद्यमान नगरसेवक हे मतदानात भाग घेतील, असा इशारा सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला आहे. प्रशासनाने ठरल्याप्रमाणे जुन्या नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 9 मार्चला निवडणूक घ्यावी. परंतु विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपण्यापूर्वी ही निवडणूक घेतल्यास याला आपला विरोध असल्याचेही तृष्णा विश्वासराव यांनी ‘मुंबई लाईव्ह’शी बोलतांना स्पष्ट केले. त्यामुळे येत्या 8 तारखेला महापौरपदाची निवडणूक झाल्यास विद्यमान आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यात राडेबाजी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा