Advertisement

...तर मराठी सिनेमातही अभिनय करेन - अक्षय कुमार


...तर मराठी सिनेमातही अभिनय करेन - अक्षय कुमार
SHARES

आगामी मराठी सिनेमा चुंबकची प्रस्तुती करत मराठीत नवीन इनिंग्ज सुरू करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारनं भविष्यात मराठी सिनेमातही काम करणार असल्याचं संकेत देत त्याच्या मराठमोळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.


चुंबकचा ट्रेलर लाँच

जर वेगळ्या कथांवरील चांगल्या पटकथा मिळाल्या, तर मी केवळ मराठी चित्रपटांची निर्मितीच करणार नाही तर त्यामध्ये अभिनयसुद्धा करेन, असं अस्खलित मराठीत म्हणत अक्षय कुमारनं भविष्यात मराठी सिनेमात काम करण्याचे जणू संकेतच दिले आहेत. स्वप्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ या मराठी सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी बोलताना अक्षयनं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला चित्रपटाचे निर्माता नरेन कुमार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदी तसंच गीतकार, गायक, कलाकार व या चित्रपटाचे मुख्य नायक स्वानंद किरकिरे, दोन नवोदित कलाकार संग्राम देसाई आणि साहिल जाधवसुद्धा उपस्थित होते.


हिंदीत कथेचा अभाव

मला रितेश देशमुखचा ‘बालक पालक’ आणि ‘लई भारी’ हे चित्रपट आवडले. दिवंगत दादा कोंडके या मराठीतील आघाडीच्या कलाकारावरील चरित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्नसुद्धा आम्ही केला होता. पण पटकथा मनासारखी जुळून आली नाही आणि तो विचार मनातून काढल्याचंही अक्षय म्हणाला. हल्ली हिंदी चित्रपटांमध्ये कथेचा अभाव असतो हेही अक्षयनं मोकळेपणानं मान्य केलं.


चुंबक पाहून भारावलो

‘चुंबक’ या सिनेमाबाबत अक्षय म्हणाला की, निर्माते नरेन कुमार यांनी आयोजित केलेल्या विशेष शोमध्ये ‘चुंबक’ हा भावूक करणारा सिनेमा पाहिला आणि भारावून गेलो. हा चित्रपट म्हणजे नरेन आणि दिग्दर्शक संदीप मोदी यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न आहे. आता त्यात मीही सामील झालो हे मी माझं भाग्य मानतो. ‘चुंबक’ पाहिल्यावर या चित्रपटाचा प्रस्तुतकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारताना पैशांचा विचार कधीही मनाला शिवला नाही. या चित्रपटाशी जोडलं जाऊन त्यातून फायदा कमवावा असं कधी वाटलंच नाही, असंही तो म्हणाला.


पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी

पैसे कमावण्यासाठी नव्हे, तर समाधानासाठी ‘चुंबक’चा प्रस्तुतकर्ता बनल्याचं सांगत अक्षय म्हणाला की, जर मी ठरवलं असतं तर ‘रावडी राठोड २’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली असती. पण मी ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट निवडले. कारण मला महिलांना दैनंदिन जीवनात ज्या समस्या भेडसावतात त्या लोकांसमोर आणायच्या होत्या.

खराखुरा अभिनय 

‘चुंबक’मध्ये खराखुरा अभिनय आहे. हा असा चित्रपट आहे, जो तुम्हाला सांगेल की तुमच्या आयुष्यात दोन मार्ग आहेत. एक चांगला आणि दुसरा वाईट. त्यापैकी कोणता निवडायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. मी माझ्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत १३० चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि याआधी दोन मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. पण ‘चुंबक’सारख्या चित्रपटात काम केलेलं नाही किंवा त्याची निर्मिती केलेली नाही.

मराठीचं श्रेय शिक्षिकेला 

आपल्या अस्खलित मराठी बोलण्याचं सारं श्रेय शाळेतील मराठी शिक्षिकेला द्यायलाही अक्षय विसरला नाही. दहा वर्षांपूर्वी ‘अधिकार’ या मराठी सिनेमात काम केल्याची आठवणही अक्षयने यावेळी करून दिली. याशिवाय दोन मराठी सिनेमांची निर्मितीही केल्याचंही सांगितलं.



हेही वाचा - 

‘पुष्पक विमान’ ची संगीतमय सफर सुरू

...आणि रोहित शेट्टीने महावीरला दिली शाबासकी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा