Advertisement

अंशुमनची ‘चाल तुरू तुरू...’


अंशुमनची ‘चाल तुरू तुरू...’
SHARES

विनोदी भूमिकांइतक्याच धीरगंभीर भूमिकाही यशस्वीपणे साकारणाऱ्या अभिनेता अंशुमन विचारेच्या संकल्पनेतून एक धमाल विनोदी सांगितीक मैफल आकाराला आली आहे. ‘चाल तुरू तुरू’ या नावाने सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा शुभारंभ अंशुमन पुणे येथील ‘निवारा’ या वृद्धाश्रमात करणार आहे.  आज मराठी सिनेसृष्टीतील बरेचसे कलावंत आपापल्या परीने समाजोपयोगी कामं करीत दीनदुबळ्यांच्या जीवनाला आकार देण्याचं काम करीत आहेत. 

विनोदी अभिनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ज्याला ओळखतो तो अंशुमन विचारेही या कामात मागे नाही. अनाथ मुलींना शिक्षण देण्यासोबतच वृद्धाश्रम-अनाथाश्रमांसाठीही अंशुमन अगदी बेमालूमपणे कार्य करत असतो. आपण केलेल्या समाजकार्याची पब्लिसिटी करणं अंशुमनला आवडत नसलं, तरी एखाद्या नवीन कार्यक्रमाची सुरुवात ‘निवारा’ सारख्या वृद्धाश्रातून करणं यातच त्याच्या मनात दडलेली सेवाभावी वृत्ती जाणवते. याबाबत अंशुमनने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्ल्युझीव्ह बातचित केली.


वृद्धाश्रमातूनच सुरुवात का?

रसिकांसाठी आपण नेहमीच कार्यक्रम करत असतो.  पण वृद्धांचं आयुष्य उतरणीला लागलेलं असतं. त्यामुळे त्यांना मनोरंजनाची आणि आपुलकीच्या क्षणांची आपल्यापेक्षा जास्त गरज असते असं मला वाटतं. यासोबतच एखाद्या शुभकार्याची सुरुवात ज्येष्ठांचा आशीर्वादाने व्हावी या भावनेतून ५ जुलै रोजी ‘निवारा’मध्ये ‘चाल तुरू तुरू’चा पहिला प्रयोग सादर करणार आहे.


धमाल विनोदी सांगितीक मैफल

‘चाल तुरू तुरू’मध्ये मनोरंजन करणारं सारं काही आहे. यात गाणीही आहेत आणि किस्सेही... इमोशनही आहे आणि रोमँटिक अंदाजही... शेरो-शायरीही आहे आणि सद्य परिस्थितीवर भाष्य करणारी शैलीही... त्यामुळे हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांना आवडेल.


चाल तुरू तुरूच का?

माणसाच्या आयुष्याची चाल आणि गाण्याची चाल ही जरा जरी बिघडली, तर आयुष्य गाण्यासारखं बेसूर व्हायला वेळ लागत नाही. हे आयुष्य बेसूर होऊ नये, जीवनाचा आनंदोत्सव व्हावा यासाठी याची चाल तुरू तुरू आहे. हा शो पाहताना सर्वजण हसतील आणि सद्य परिस्थितीशी स्वत:च एकरूप होतील. त्यातून जे चांगलं वाटतं ते कदाचित करतीलही.


काय स्वरूप असेल?

या कार्यक्रमाची सुरुवात नांदीपासून होईल. फ्युजन नांदी आहे. मैफिलीचा हा बैठा कार्यक्रम आहे. यात सर्व कलागुणांचा आस्वाद घेता येईल. २५ गाणी असतील. त्यातही ४० टक्के गाजलेली गाणी आणि ६० टक्के नवीन गाणी. ही गाणी गाजलेल्या गाण्यांच्या माध्यमातून वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारी असतील. यात विनोदी किस्सेही असतील. यात मी रसिकांना हसवण्यासोबतच गाणीही गाणार आहे.


कुठेही करता येण्याजोगा

या कार्यक्रमाची संकल्पनाच मूळात कुठेही करता येऊ शकेल यावर आधारित असल्याने त्याची बांधणीही तशीच करण्यात आली आहे. यासाठी मोठा हॅाल नको की, रंगमंच नको. कुठेही भारतीय बैठक मांडून हा कार्यक्रम करता येऊ शकतो. उपस्थितांना मनमुराद आनंद लुटता यावा एवढी जागा आणि दाद देणारे रसिक मायबाप असतील तर कुठेही आम्ही ‘चाल तुरू तुरू’ करू शकतो.


महाराष्ट्रभर रंगणार ‘चाल तुरू तुरू’

पुण्यात शुभारंभाचा शो सादर केल्यानंतर अंशुमन आणि त्याच्या टिमचा हा हास्यकल्लोळ महाराष्ट्रभर रंगणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ होण्यापूर्वीच अंशुमनला कोकण, विदर्भ, खान्देश या ठिकाणांहून बोलावणं आलं आहे. याखेरीज मुंबईतही काही ठिकाणी कार्यक्रम करण्याबाबत बोलणी सुरू आहेत.


यांची लाभली साथ

‘चाल तुरू तुरू’ करण्यात अंशुमनला काही सहकाऱ्यांचा हातभार लागला आहे. यात गायिका स्नेहा दांडेकर, पद्मजा पाटील, संगीत संयोजक विनय चेऊलकर, व्यवस्थापक दीपक गोडबोले, जाहिरात संकल्पना संतोषी पवार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना अंशुमनचीच असून, लेखन चेतन सैंदाडे याने केलं आहे.हेही वाचा -

कॉम्रेड अजित अभ्यंकर रुपेरी पडद्यावर

उत्सुकता सचिन दरेकरांच्या 'पार्टी' ची


 

संबंधित विषय
Advertisement