Advertisement

Exclusive : झाडांची कत्तल करायला लाज वाटायला हवी - सयाजी शिंदे

अभिनेते सयाजी शिंदे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडून वृक्ष लागवड आण संवर्धनाचं मोलाचं काम करीत आहेत. आज त्यांचं हे कार्य २० जिल्ह्यांमध्ये पोहोचलं आहे.

Exclusive : झाडांची कत्तल करायला लाज वाटायला हवी - सयाजी शिंदे
SHARES

पडद्यावर खलनायक साकारणारे काही कलाकार वास्तवात गोड चेहऱ्याच्या नायकांपेक्षा सहृदय असतात. मराठमोळ्या सयाजी शिंदे यांनी मराठीसोबतच हिंदी, तामीळ, कन्नड, तेलुगू अशा दक्षिणात्य सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पडद्यावर क्रूर वागणारे सयाजी शिंदे वास्तवातही स्पष्ट बोलणारे आहेत. पण निसर्ग आणि झाडांचा विषय निघतो तेव्हा त्यांचं मन नकळतपणे हळवं होतं. 

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडून ते वृक्ष लागवड आण संवर्धनाचं मोलाचं काम करीत आहेत. आज त्यांचं हे कार्य २० जिल्ह्यांमध्ये पोहोचलं आहे. यााबाबत ‘मुंबई लाइव्ह’शी एक्स्क्लुझीव्ह बातचीत करताना त्यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत विस्तृतपणे सांगितलं.


आई आणि झाड महत्वाचं

खरोखर वाटतं की हे झाडाचं काम माझा आनंदाचा भाग आहे. आई आणि झाड या दोन गोष्टी जगात सर्वात महत्त्वाच्या असल्याचं मी नेहमी सांगतो. आपल्या जन्मापासून मरेपर्यंत एखादं झाड आपली सेवा करतं. अन्न, पाणी नाही मिळालं तर आपण जगू शकतो. पण आॅक्सिजन मिळाला नाही, तर जगू शकत नाही. हा आॅक्सिजन आपल्याला झाडापासून मिळतो. त्यामुळे झाडांची कत्तल करताना मनुष्य जातीला लाज वाटायला हवी. झाडं तोडून आपण स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारत आहोत हे आपल्याला कधी समजणार?


निदान भावी पिढीसाठी

लाखो, करोडो रुपयांच्या गाड्या घेऊन आपण ५०० वर्ष जगणार नाही. गाड्या कुणाला आयुष्यभर पुरणार नाहीत. निदान आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी असं देऊन जा जे त्यांना अनादीकालापर्यंत उपयोगी पडेल. आज आपण वृक्षतोड थांबवली नाही, तर खरंच पुढच्या पिढीला आॅक्सिजन मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत. जेवढ्या मोकळ्या जागा आहेत, त्या हिरव्यागार झाल्या पाहिजेत. त्या भरलेल्याच होत्या, आपल्याला पुन्हा भरायला हव्यात.


बोलावणं आल्याशिवाय नाही

आजवर आम्ही २० जिल्ह्यात पोहोचलो आहोत. माण, खटाव तालुका, कोल्हापूर, औरंगाबाद-वाघणगाव, जळगाव-चाळीसगाव, संगमनेर, म्हस्केवाडी, मंगळवेढा, सोलापूर-जैनवाडी अशा बऱ्याच ठिकाणी झाडं लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. कोकणातूनही निरोप आला आहे. पण सध्या समोरून अॅप्रोच आल्याशिवाय कुठे काही सुरू करत नाही. कारण आपण स्वत:हून काम करायला गेलो की, आपण त्यांच्या घरचे नोकर असल्यासारखी वागणूक देतात. त्यामुळे ज्यांना खरोखर महत्त्व पटलं आहे, तिथेच जाऊन काम करत आहोत.


८०० एकरमध्ये लागवडीचं लक्ष्य

सातारा जिल्ह्यात पोलिस खात्याची जागा आहे. अग्निशमन दलाच्या १०० एकर जागेपैकी ८० एकरवर यावर्षी झाडं लाणार आहोत. २५०० झाडं, तळं आणि पाण्याची सोय करणार आहोत. पुढील पाच वर्षांमध्ये ८०० एकरमध्ये झाडांची लागवड करण्याचं उद्दीष्ट आहे. कोल्हापूरमधील तलसिंदे गावात १५० एकर जमीन आहे. तिथंही झाडं लावण्याची योजना आहे. नाशिकला मिलिट्रीची २५० ते ३०० एकर जागा आहे. यावर्षी जमलं तर त्या कामालाही सुरुवात करणार आहोत.


लोकांना पटत नसल्याची खंत

या कामासाठी प्लॅनिंग करणं, प्रेरणा देणं, समविचारी लोकांना भेटणं, महिन्या-दोन महिन्यातून गावांना भेटी देणं यासाठी वेळ काढावाच लागतो. पण अजूनही ज्या पद्धतीने लोकांना पटायला पाहिजे ते पटत नाही याचीच खंत वाटते. हेच खरं दुर्दैव आहे. सुशिक्षीत लोकांनाही पटत नाही. जे सहजपणे करू शकतात ते करू शकत नाहीत. लग्नासाठी लाखो रुपये खर्च करतील, पण त्यातील काही पैसे झाडांसाठी खर्च केले, तर ती पाचशे-हजार वर्ष जगतात ही कल्पनाच लोकांच्या डोक्यात शिरत नाही.


रॅाक गार्डनची संकल्पना

रॅाक गार्डनची संकल्पना दिवडीमध्ये राबवायची होती. पण दुर्दैवाने शक्य झालं नाही. या कामात निसर्गाचा नव्हे, तर मनुष्य जातीचाच जास्त त्रास होत आहे. डोक्यात खूप कल्पना आहेत. केव्हा तरी त्या सत्यात उतरतीलच. रॅाक गार्डनमध्ये प्रत्येक झाडाचं नाव, वेगवेगळी माती, निरनिराळे दगड, त्यांची नावं लिहिली जातील. तिथे शाळेच्या सहली जाव्यात. पुढच्या पिढीला त्याबाबत ज्ञान मिळावं. आयुर्वेदिक झाडांची वेगळी, फळांची वेगळी, फुलांची वेगळी, वेली वेगळ्या असं बरंच काही वेगवेगळं करायचं आहे. हळूहळू त्यातले अडथळे समजले आहेत.


शासकीय मदत म्हणजे विनोद

शासकीय पातळीवर मदत मिळणं विनोदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्यावर न बोललेलंच बरं. मिळालाच चांगला सपोर्ट तर घ्यायचा नाहीतर आपलं काम सुरू ठेवायचं असं ठरवलं आहे. कोण वाईट आणि कोण चांगलं हे न पाहता ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आणि जे समविचारी चांगली माणसं आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं.



हेही वाचा -

‘Once मोअर’ म्हणत सिनेमाकडे वळला आशुतोष पत्की

‘पटरी बॉईज’ १९ ऑक्टोबरपासून रुळावर



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा