Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार


ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार
SHARES

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत 'झी गौरव पुरस्कार' हा सर्वात मनाचा पुरस्कार. नुकताच हा सोहळा मोठ्या थाटामाटात मुंबईमध्ये पार पडला. मात्र सर्वांनाच उत्सुकता असते बाजी मारली कुणी हे जाणून घेण्याची. या वर्षीच्या झी गौरव पुरस्कारात बाजी मारली ती 'सैराट' या सिनेमाने.

पण त्याच बरोबर आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘पाठलाग’, ‘वरदक्षिणा’, ‘सरस्वती चंद्र’, ‘आनंद’ अशा एक ना अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सीमा देव यांना यावर्षीचा 'झी जीवन गौरव पुरस्कार' बहाल करण्यात आला. ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सीमा यांच्यासह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते. “आजवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कलाक्षेत्राची जेवढी सेवा करता येईल ती प्रामाणिकपणे केली. प्रेक्षकांनी वेळोवेळी त्यांच्या आवडीची पोचपावती दिली आणि आता हा पुरस्कार म्हणजे त्या साऱ्या मेहनतीचं गोड फळ आहे” असे मनोगत सीमा यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी रंगमंचावर सीमा यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र अजिंक्य आणि अभिनय देव तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. या रंगतदार सोहळ्याचं खुमासदार सूत्रसंचालन प्रियदर्शन जाधव आणि सुमीत राघवन यांनी केलं. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रंगात रंगवून टाकणारा असा हा भव्य दिव्य सोहळा येत्या 26 मार्चला सायंकाळी 7 वा. झी मराठी आणि झी मराठी एचडी वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा