वरुन-आलियासमोर 'भिकारी'चं गाणं!

 Mumbai
वरुन-आलियासमोर 'भिकारी'चं गाणं!
Mumbai  -  

मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' ह्या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच 'देवा हो देवा' हे भव्य गाणे लाँच करण्यात आले. गणपतीवर आधारित असलेले हे गाणे मराठी गाण्याच्या चित्रिकरणात सर्वात श्रीमंत गाणे ठरत आहे. अंधेरी येथील पीव्हीआर आयकॉनमध्ये सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत रंगलेल्या या शानदार सोहळ्यात, बॉलीवूडस्टार आलिया भट आणि वरुन धवन यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरला. या दोघांनी स्टेजवर येत, मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शकीय पदार्पण करणारे डान्समास्टर गणेश आचार्य यांना चीअर-अप करण्यासाठी डान्स परफॉर्मन्स देखील केला.

अखंड बॉलीवूडला आपल्या ठेकात नाचवणारे गणेश आचार्य यांच्या शैलीतले 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' या सिनेमातील हे गाणे, बॉलीवूड गाण्यांना लाजवेल इतके भव्य-दिव्य असल्याचे पाहायला मिळते. गणेशावर आधारित असलेल्या या गाण्याच्या चित्रिकरणासाठी पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीमध्ये इतका मोठा तामझाम आखलेला दिसून येतो. 'देवा हो देवा' असे बोल असलेल्या या गाण्यातून ३५ फूट उंच भव्य गणेशमूर्तीचे दर्शन आपल्याला घडते. या गाण्यात तब्बल एक हजार कलाकार थिरकताना दिसून येतात. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरु ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे विकी नागर आणि प्रसन्न देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे, तर या गाण्याचे बोल सुखविंदर सिंग आणि दिव्य कुमार यांनी गायले आहेत. 'भिकारी' सिनेमातील हे गाणे येत्या गणेशोत्सवात गणेशभक्तांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

येत्या ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा सिनेमा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा आहे.


Loading Comments