Advertisement

कलाकारांची होळी

यंदाच्या होळीचं औचित्य साधत मराठी सिने आणि मालिका विश्वातील कलाकारांनी आपल्या मनात दडलेल्या आठवणी शेअर केल्या. त्यासोबतच होळी कशी साजरी करायला हवी याबाबतही आपलं मत व्यक्त केलं...

कलाकारांची होळी
SHARES

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशीच्या म्हणजेच रंगपंचमीच्या जशा सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात, तशाच त्या कलाकारांच्याही असतात. यंदाच्या होळीचं औचित्य साधत मराठी सिने आणि मालिका विश्वातील कलाकारांनी आपल्या मनात दडलेल्या आठवणी शेअर केल्या. त्यासोबतच होळी कशी साजरी करायला हवी याबाबतही आपलं मत व्यक्त केलं...


स्वप्नील जोशी

होळी हा सण रंगांचा आणि उत्साहाचा आहे. त्यामुळे तो त्याच भावनेतून खेळला गेला पाहिजे. कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. सणाचे दिवस असले तरी चौकस राहून चौफेर नजर ठेवत जागृत राहणंही तितकंच गरजेचं आहे. कोणालाही त्रास न देता रंगपंचमीचा सण साजरा करा. नैसर्गिक रंग वापरा. आज कामात व्यग्र असतो. त्यामुळं दरवर्षी होळी खेळता येतेच असं नाही. पण बालपणीच्या आठवणी मात्र नक्की येतात.


सयाजी शिंदे

मी नेहमीच पर्यावरणपूरक होळीला प्राधान्य देतो. रूढी परंपरांच्या नावाखाली जिवंत झाडांची कत्तल केली जाते. मी त्याविरोधात आहे. बऱ्याचदा कांटेसावर या औषधी वृक्षाचा होलिका दहनासाठी बळी दिला जातो. हे थांबलं पाहिजे. कांटेसावर या औषधी वनस्पतीचं जतन आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. याबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी यासाठी नुकताच साताऱ्यामधे पहिला कांटेसावर महोत्सव भरवण्यात आला होता.


भार्गवी चिरमुले

माझी नवी मालिका ‘मोलकरीण बाई’ येत्या २५ मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे. मालिकेत आम्ही धुळवडीचा खास सिक्वेन्स शूट केलाय. यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी मी रंग खेळले. हा धमाकेदार सीन लवकरच मालिकेत पाहायला मिळेल. आनंद हा शोधण्यात असतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मुक्या प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत सण साजरे व्हायला हवेत असं मला वाटतं.


आशुतोष कुलकर्णी

मी मुळचा पुण्याचा. होलीका दहनानंतर पाचव्या दिवशी येणारी रंगपंचमी आम्ही साजरी करायचो. कॉलेजच्या मित्रांसोबत तेव्हा रंग, पिचकारी आणून मी दणक्यात हा सण साजरा केलाय. आता तसं सेलिब्रेशन करणं जमत नाही. मालिकेच्या निमित्ताने दरवर्षी सेटवरच रंगपंचमी साजरी होते. पण होळीची पूजा मात्र मी दरवर्षी न चुकता करतो. सणाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गोडाधोडाचा आस्वादही घेतो.


गौरव घाटणेकर

होळी आणि धुळवडीच्या माझ्या खुपच खास आठवणी आहेत. शाळेत असताना अगदी शाई फेकण्यापासून या सेलिब्रेशनला सुरुवात व्हायची. आईच्या हातच्या गरमागरम पुरणपोळीवर ताव मारत मी हा सण साजरा करायचो. आता पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकडे माझा कल असतो. यंदा ‘ललित २०५’ च्या सेटवर मी धुळवडीची सगळी हौस भागवून घेतलीय. सलग ३ दिवस आम्ही सीनच्या निमित्ताने सेटवर होळी साजरी केली.


अमृता पवार

मी मुळची कोकणातली. त्यामुळे दरवर्षी कोकणातल्या शिमगोत्सवाला आवर्जून जायचे. यंदा शूटिंगमुळे जाणं होणार नाही. पण गावात साजरा केला जाणारा हा सण खूपच स्पेशल आहे. पारंपरिक पद्धतीने बांधली जाणारी होळी, त्यानिमित्ताने नातेवाईकांच्या होणाऱ्या भेटीगाठी आणि खास म्हणजे कोकणात घरोघरी येणारी देवाची पालखी हा माहोल भारावून टाकणारा असतो.


अश्विनी कासार

मुळची बदलापूरची असलेली मी एकत्र कुटुंबात वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे मिळून अंगणात होळी बांधायचो आणि आजही ही प्रथा अखंड सुरु आहे. माझी आजी होळीसाठी द्राक्षापासून दागिने बनवायची. आम्हा मुलांसाठीही बत्ताशाचे दागिने तयार करायची. त्या दागिन्यांची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे. धुळवडही आम्ही एकत्र खेळायचो. यादिवशी किचनचा संपूर्ण ताबा घरातल्या पुरुष मंडळींकडे असतो. गरमागरम भजी आणि वड्यांचा बेत धुळवडीच्या निमित्ताने दरवर्षी आखला जातो. यंदा ‘मोलकरीण बाई’च्या सेटवर आम्ही धुळवड खेळलो.


संहिता जोशी

हा रंगोत्सव मी नेहमी उत्साहात आणि माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींसोबत साजरा करते.. यादिवशी चहूबाजूला होणारी रंगाची उधळण मनावर आलेली मरगळ झटकन दूर सारते. होळी या सणाच्या माझ्या अगणित आठवणी आहे. मुळातच मला होळीची पूजा, होळीची गोष्ट, त्यातून मिळणार सकारात्मक संदेश हे सर्व मला खूप भावते. मी स्वतः हे सर्व दरवर्षी होळीला करते. मला एक समाधान आहे की कुठेतरी मी पर्यावरणाला त्रास न होता एक सण साजरा करते. तुम्हीही पर्यावरणपूरक होळी साजरी करा.


ऋचा इनामदार

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी लोक आपले जुने सर्व राग, रोष विसरून एकमेकांना रंग लावतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतात, जुन्या आणि अमंगल गोष्टीचा होळी मध्ये जाळून नाश करायचा, आणि नव्या चांगल्या गोष्टींचा स्विकार करायचा असा होळी साजरी करण्यामागचा खरा विचार आहे. मी दरवर्षी हा विचार अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. होळीच्या विविध रंगांप्रमाणे रंगबेरंगी आयुष्य मी जगत असते. मला हा सण प्रचंड आवडतो. लहानपणी मी या सणाची अगदी आतुरतेने वाट बघायचो. दरवर्षी आम्ही सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारचे लोक एकत्र येऊन हा रंगोत्सव अतिशय उत्साहाने साजरा करतो. मला रंग आणि जास्त करून पाण्याचे खूपच आकर्षण आहे. होळी खेळताना कोरड्या रंगाचा वापर जास्त आणि पाण्याचा वापर कमी करा.


मयुरी देशमुख

रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारा रासायनिक रंग, पिशव्या, फुगे पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी किती धोकादायक आहे, त्याचे दुष्परिणाम कळायला लागल्यापासून मी खूप उत्साहाने रंगपंचमी साजरी करत नाही. मागील तीन चार वर्षांपासून मी खूप साध्या पद्धतीने होळी साजरी करते. नैसर्गिक रंगांचा वापर करून, खूप काही गोंधळ, गाजावाजा नाही. कॉलेजमध्ये असताना मात्र रंगपंचमी आम्ही वेड्यासारखी खेळायचो. परंतु आता हे सर्व थांबवले आहे. मुळात मी प्राणीप्रेमी असल्यामुळे मला प्राण्यांना रंग वगैरे लावलेले अजिबात आवडत नाही. त्यामुळे होळीचा सण साजरा करण्याची माझी संकल्पना आता बदलली आहे. पण कॉलेजच्या काळात मी सगळ्यात जास्त होळीच एन्जॉय केली आहे. मी दुसरीत असताना पुण्यात खेळलेली होळी. त्यावेळी मी पहिल्यांदाच होळी खेळले होते. त्यानंतरही अनेकदा रंगपंचमी खेळले .परंतु दुसरीत असताना पहिल्यांदाच खेळलेली ही रंगपंचमी माझ्या कायम स्मरणात राहणारी आहे.



हेही वाचा -

'वेडिंगचा शिनेमा'नं दिले ऑनलाइन गायक

‘जागते रहो’ म्हणत मराठी सिनेसृष्टी पेटवणार देशभक्तीची ज्योत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा